नेरळ : कर्जत तालुक्यातील टाटा पॉवरचे पाणी उल्हास नदीत सोडले जाते त्यापैकी काही पाणी चिल्हार नदीत सोडण्यात यावे, या संदर्भातले निवेदन भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र साटम यांनी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना मंत्रालयात दिले.
साटम यांनी निवेदनात, कर्जत तालुक्यातील टाटा भिवपुरी पॉवर हाउसचे वीजनिर्मितीनंतरचे पाणी उल्हास नदीत सोडण्यात येते. यापैकी काही पाणी कालव्याद्वारे अथवा पंपिंग करून तालुक्यातील चिल्हार नदीत सोडल्याने, संपूर्ण आदिवासी उपयोजनेच्या अंतर्गत येण्यास किमान साठ ते सत्तर गावांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होऊ शकेल. तसेच जनावरांना व शेतीलादेखील मुबलक पाणी मिळू शकेल. या भागात मार्चनंतर पाण्याची तीव्र टंचाई असते. त्यामुळे बहुसंख्य आदिवासी लोकसंख्या असलेली गावे शासनाने ट्रायबल झोन म्हणून विशेष योजनांचा लाभ दिलेला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या कामी चिल्हार जोडनदी प्रकल्पाबाबत दिल्लीत नितीन गडकरी यांच्या सोबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आल्याचा संदर्भ निवेदनात करण्यात आला आहे.जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी निवेदन स्वीकारून तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन साटम यांना दिले.