नवी मुंबई सेझची 5,286 एकर जमीन रिलायन्सकडे; १,६२८ कोटींना ५७.१२ कोटी इक्विटी शेअर्सची खरेदी
By नारायण जाधव | Updated: January 14, 2025 11:57 IST2025-01-14T11:57:10+5:302025-01-14T11:57:28+5:30
रिलायन्सने ५७.१२ कोटी इक्विटी शेअर्स विकत घेतले असून प्रतिशेअरची किंमत २८ रुपये ५० पैसे आहे.

नवी मुंबई सेझची 5,286 एकर जमीन रिलायन्सकडे; १,६२८ कोटींना ५७.१२ कोटी इक्विटी शेअर्सची खरेदी
- नारायण जाधव
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी आणि अटल सेतूनजीकची नवी मुंबई सेझची सुमारे ५,२८६ एकरपेक्षा जास्त जमीन रिलायन्स समूहाने १,६२८ कोटी ३ लाख रुपयांमध्ये शेअर्सच्या माध्यमातून द्रोणागिरी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडकडून अधिग्रहित केली आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्वात मोठा वाणिज्यिक आणि औद्योगिक जमीन सौदा असल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.
याबाबतची माहिती आनंद जैन यांच्या जय कार्प लिमिटेडने सेबी अर्थात स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर होल्डिंग्सच्या उपकंपनी म्हणजेच द्रोणागिरी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडने पूर्वीच्या नवी मुंबई सेझ व आताच्या नवी मुंबई एकात्मिक औद्योगिक क्षेत्रामधील ७४ टक्के हिस्सा रिलायन्स समूहास अवघ्या १,६२८ कोटी तीन लाख रुपयांना शेअर्स स्वरुपात विकला आहे. रिलायन्सने ५७.१२ कोटी इक्विटी शेअर्स विकत घेतले असून प्रतिशेअरची किंमत २८ रुपये ५० पैसे आहे.
नकाराधिकार नाकारला
पूर्वाश्रमीच्या नवी मुंबई सेझमधील ही जमीन असल्याने या व्यवहारात सिडकोने आपला नकाराधिकार मागे घेतल्यानंतर हा व्यवहार पूर्ण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. रिलायन्सनेही याबाबत सेबीला कळविले आहे. या सेझमध्ये सिडकोचा २६ टक्के हिस्सा आहे. बाजारमूल्यापेक्षा शेअर्स स्वरूपातील हा व्यवहार कितीतरी पटीने कमी असल्याचे सांगितले जाते.
एकात्मिक औद्योगिक वसाहतीस परवानगी
- या शेअर्स अधिग्रहणानंतर रिलायन्सही आता एनएमआयआयए अर्थात नवी मुंबई एकात्मिक औद्योगिक क्षेत्र या कंपनीची ७४ टक्के हिस्सा असलेली टक्के उपकंपनी बनली आहे.
- एनएमआयआयएची स्थापना १५ जून २००४ रोजी झाली असून, ती महाराष्ट्रात एकात्मिक औद्योगिक क्षेत्र विकसित करेल असे सांगून मार्च २०१८ साली तत्कालीन महाराष्ट्र सरकारने एनएमआयआयएला सेझऐवजी एकात्मिक औद्योगिक क्षेत्रात रूपांतरित करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार एनएमएमआयआयची द्रोणागिरी, कळंबोली या अधिसूचित क्षेत्रांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे.