रिलायन्सला मुख्य जलवाहिनीतून पाणी

By admin | Published: June 22, 2017 12:33 AM2017-06-22T00:33:13+5:302017-06-22T00:33:13+5:30

नियमाप्रमाणे मुख्य जलवाहिनीमधून कोणालाही थेट पाणीपुरवठा करता येत नाही; परंतु कोपरखैरणेमध्ये रिलायन्स वसाहत व शाळेसाठी नियमबाह्यपणे नळजोडणी देण्यात आली

Reliance gets water from main water channel | रिलायन्सला मुख्य जलवाहिनीतून पाणी

रिलायन्सला मुख्य जलवाहिनीतून पाणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नियमाप्रमाणे मुख्य जलवाहिनीमधून कोणालाही थेट पाणीपुरवठा करता येत नाही; परंतु कोपरखैरणेमध्ये रिलायन्स वसाहत व शाळेसाठी नियमबाह्यपणे नळजोडणी देण्यात आली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक देविदास हांडेपाटील यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये केली आहे.
कोपरखैरणेमध्ये दोन दिवसांपासून पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. अधिकाऱ्यांना विचारणा केली असता मोरबे परिसरामध्ये विद्युत पुरवठा खंडित झाला असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असल्याचे सांगण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसताना याच परिसरामधील रिलायन्स वसाहत व शाळेसाठी मात्र मुबलक पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. संबंधितांना मुख्य जलवाहिनीमधून थेट नळजोडणी देण्यात आली आहे. महापालिका कार्यक्षेत्रामध्ये कोणालाही मुख्य जलवाहिनीमधून नळजोडणी दिली जात नसताना रिलायन्सवर वरदहस्त का, असा प्रश्न हांडेपाटील यांनी उपस्थित केला. या प्रकरणी चौकशी करण्यात यावी व रिलायन्स वसाहतीला इतर नागरिकांप्रमाणे जलकुंभावरून पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनीही हे प्रकरण गंभीर आहे. राजाला वेगळा न्याय व प्रजेला वेगळा न्याय असा प्रकार सुरू आहे. रिलायन्स समूहाला थेट जलवाहिनीमधून पाणीपुरवठा करण्यात आला असेल तर तो तत्काळ खंडित करण्यात यावा व सर्वांना समान न्यायाने पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी या वेळी केली.
शहर अभियंता मोहन डगावकर यांनीही पालिका कोणालाही मुख्य जलवाहिनीमधून नळजोडणी देत नाही. कोपरखैरणेमध्ये तशाप्रकारे जोडणी दिली असेल, तर त्याची चौकशी करून योग्य कार्यवाही केली जाईल, असे स्पष्ट केले. मोरबे धरण परिसरात महावितरणच्या फिडरमध्ये बिघाड झाला असल्याने विद्युत पुरवठ्यावर परिणाम झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. कोपरखैरणे व इतर परिसरामध्ये पाणीपुरवठ्याच्या समस्या सोडविण्यासाठीही प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Reliance gets water from main water channel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.