तळोजातील कैद्यांची पुलवामा हल्ल्यातील शहिदांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 12:49 AM2019-06-03T00:49:17+5:302019-06-03T00:49:34+5:30
बक्षिसाची रक्कम देणार शहिदांच्या कुटुंबीयांना : रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करणार निधी
वैभव गायकर
पनवेल : राष्ट्रभक्तीपर निबंध स्पर्धेत विजेते ठरल्यानंतर तळोजा मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांनी आपल्या पारितोषिकांची रक्कम पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांसाठी देऊन नवा आदर्श निर्माण केला आहे. रामचंद्र प्रतिष्ठान मार्फत या स्पर्धेचे आयोजन तळोजा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आले होते.
मुंबईस्थित रामचंद्र प्रतिष्ठान ही संस्था महाराष्ट्रातील विविध कारागृहांमध्ये राष्ट्रभक्तीपर निबंध स्पर्धेचे आयोजन करत असून, यंदा ही स्पर्धा १६ कारागृहांमध्ये आयोजित करण्यात आली. त्यात दोन हजारांहून अधिक महिला व पुरुष स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
तळोजा कारागृहात ७ मे रोजी भरविण्यात आलेल्या स्पर्धेत तब्बल ५० कैदी सहभागी झाले होते. यात तीन जणांची उत्कृष्ट लिखाणाबद्दल निवड करण्यात आली. तर पाच स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर करण्यात आली. यापैकी एका कैद्याने बक्षिसाची रक्कम पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांसाठी देऊ केली. त्यानंतर सर्वच विजेत्या स्पर्धकांनी आपल्या बक्षिसाची रक्कम शहिदांच्या कुटुंबीयांना देण्याचा निर्णय घेतला. या कार्यक्रमासाठी कारागृहाचे अधीक्षक कौस्तुभ कुलेकर, शिक्षक नामदेव शिंदे तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या ज्येष्ठ सदस्या, लेखिका अनुराधा खोत, ज्येष्ठ कामगार नेते अण्णासाहेब देसाई, महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे सदस्य देवेंद्र गंद्रे तसेच रामचंद्र प्रतिष्ठानचे अशोक शिंदे उपस्थित होते.
उपक्रमाला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे साहाय्य मिळाले आहे. तळोजा मध्यवर्ती कारागृहातील अनेक बंदिवान स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेऊन आपले विचार मराठी, हिंदी व इंग्रजी निबंधातून व्यक्त केले. त्यांचे परीक्षण डॉ. सुमेधा मराठे यांनी केले असून, निबंधातून व्यक्त झालेले विचार अत्यंत प्रभावी आहेत. बंदिवान कारागृहातून बाहेर आल्यानंतर समाजासाठी चांगले काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रातील कारागृहांत नियमितपणे स्पर्धा राबविण्यात येणार असल्याचे संस्थेच्या संचालिका नयना शिंदे यांनी सांगितले. पारितोषिकाची रक्कम रायगड जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून त्यांच्या मार्फत शहिदांच्या कुटुंबीयांपर्यंत पाठविण्यात येईल, असे तळोजा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक कौस्तुभ कुलेकर यांनी सांगितले.