- मयूर तांबडेपनवेल - कर्नाळा अभयारण्यात ठाण्यातील २९ तरुण-तरुणींचा एक ग्रुप भरकटला होता. स्थानिक पोलीस, वन विभाग आणि निसर्गमित्र या संघटनेच्या मदतीने या सगळ्यांना शनिवारी रात्री सुखरूपपणे खाली उतरवण्यात आले.माची-प्रबळगड, कर्नाळा अभयारण्यात ट्रेकिंगसाठी येणाऱ्यांना या परिसराची अचूक माहिती नसल्याने अनेकदा ते भरकटतात. शनिवारी ए.पी. शहा कॉलेज, ठाणे येथील २९ विद्यार्थी कर्नाळा अभयारण्य येथे फिरण्यासाठी आले होते. सकाळी ११ वाजता त्यांनी कर्नाळा किल्ला चढण्यास सुरुवात केली. त्यांना कर्नाळा किल्ल्याची जास्त माहिती नसल्याने ते वाट चुकले आणि किल्ल्यावर अडकले. तेथून खाली किंवा वर जाण्यासाठी मार्ग सापडत नसल्याने विद्यार्थी घाबरले. त्यांनी किल्ल्यावर चढणाºया दुसºया पर्यटकांना मदतीसाठी हाका मारल्या. या पर्यटकांनी त्वरित तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. मात्र, तोपर्यंत अंधार पडला होता. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस.बी. चव्हाण, पोलीस हवालदार विष्णू डुबल, प्रकाश आव्हाड, मासाळ यांच्यासह वन विभाग व निसर्गमित्र संघटनेने या २९ जणांना शोधण्यासाठी तीन पथके तयार केली. रात्री ८ च्या सुमारास सर्व २९ विद्यार्थी त्यांना दिसले. त्यानंतर काहींना दोरीच्या साहाय्याने तर काहींना एकमेकांच्या मदतीने खाली आणण्यात आले.ज्यांना किल्ल्याच्या परिसराची माहिती आहे त्यांनीच अशा ठिकाणी यावे, अन्यथा स्थानिकांकडून माहिती घ्यावी किंवा सोबत गाइड घेऊन जाण्याचे आवाहन वनविभागासह पोलिसांकडून करण्यात आले आहे.
कर्नाळा अभयारण्यात अडकलेल्या ठाण्यातील २९ पर्यटकांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 6:43 AM