नवी मुंबई विमानतळास जोडणाऱ्या ४ रस्त्यांना ‘सीआरझेड’चा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 09:38 AM2023-05-06T09:38:00+5:302023-05-06T09:38:23+5:30
१०.३५ हेक्टर खारफुटीला बाधा; विमानतळ परिसरातील वाहतूक सुरळीत होणार
नारायण जाधव
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम जाेमाने सुरू असून, कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर २०२५ पर्यंत येथून विमानाचे उड्डाण करण्याचा संकल्प विकसक कंपनी आणि सिडकोने सोडला आहे. विमानतळास जोडणाऱ्या ४ रस्त्यांच्या कामांना सीआरझेड प्राधिकरणाने १२ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामध्ये १०.३५ हेक्टर खारफुटीने बाधित होणार आहे. या परवानगीमुळे सिडकोस मोठा दिलासा मिळाला आहे.
सध्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४-अ आणि ४-ब आणि नियोजित सी-लिंकशिवाय विमानतळावर पोहोचण्यासाठी दुसरा पर्याय नाही; तसेच ठाणे-बेलापूर रोड, सायन-पनेवल महामार्ग, मुंबई-पुणे महामार्ग, एक्स्प्रेस वे, मुंबई-गोवा महामार्गाने आल्यास कसे पाेहोचायचे, असा प्रश्न निर्माण होणार आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सिडकोने चार अंतर्गत रस्ते प्रस्तावित करून ते बांधण्यासाठी ‘सीआरझेड’ची परवानगी घेतली होती; परंतु मधल्या काळात कोविडमुळे कोणतेच काम सुरू होऊ शकलेले नाही. याचदरम्यान ‘सीआरझेड’ने दिलेली परवानगीही संपली. यामुळे सिडकोने मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार राष्ट्रहित लक्षात घेऊन ‘सीआरझेड’ने मुदतवाढ दिली आहे. केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालय आणि सीआरझेडने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून ही कामे करण्याचे बंधन सिडकोस घातले आहे.
आम्र मार्ग जंंक्शन ते विमानतळाच्या उत्तर सीमेपर्यंत सात किलोमीटरचा सहा लेनचा रस्ता प्रस्तावित केला आहे. हा मार्ग प्रामुख्याने विमानतळाशी संबंधित वाहतूक, संरक्षण खाते, कार्गो वाहतूक आणि छोट्या वाहनांच्या वाहतुकीसाठी उपलब्ध केला जाणार आहे.
खांदेश्वर रेल्वेस्टेशन ते विमानतळ परिसरातील गाढी नदीच्या फोर्ट कोर्ट परिसराला जोडण्यासाठी एक किमीचा ६० मीटर रुंदीचा तीन लेनचा हा रस्ता बांधण्यात येणार आहे. तो रेल्वे प्रवाशांना विमानतळापर्यंत वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणार आहे.
विमानतळ ते आम्र मार्गासह परिसराला जोडणाऱ्या पश्चिम आंतरमार्गिका बांधण्यात येणार आहेत. यामुळे विमानतळ परिसरातील वाहतूक सुरळीत आणि विनाअडथळा धावण्यास मदत होणार आहे. विमानतळ ते राष्ट्रीय महामार्ग ४-बसह इतर महामार्ग आणि परिसराला जोडणाऱ्या पूर्व आंतरमार्गिका बांधण्यात येणार आहेत. त्या तीन लेनच्या राहणार आहेत. यामुळे विमानतळ परिसरातील वाहतूक सुरळीत आणि विनाअडथळा धावण्यास मदत होणार आहे.