पनवेलची पाणी समस्या मार्गी लागणार असल्याने दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 11:33 PM2021-02-23T23:33:59+5:302021-02-23T23:34:10+5:30

२२८ दशलक्ष लीटर पाण्याची होणार उपलब्धता

Relief as Panvel's water problem will be solved | पनवेलची पाणी समस्या मार्गी लागणार असल्याने दिलासा

पनवेलची पाणी समस्या मार्गी लागणार असल्याने दिलासा

Next

पनवेल : न्हावा शेवा टप्पा ३ च्या पाणीपुरवठा योजनेचे सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन झाले. या योजनेमुळे पनवेलकरांना भेडसावणारा पाण्याचा प्रश्न बहुतांशी संपुष्टात येणार आहे. या प्रकल्पामुळे पनवेलला सुमारे २२८ दशलक्ष लीटर पाण्याची उपलब्धता होणार असल्याने पनवेलकरांच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा आहे.

या कामाचा कालावधी ३० महिन्यांचा असल्याने पुढील दोन वर्षांनंतर योजनेचे काम पूर्ण झाल्यावर पनवेलकरांना पाणी प्रश्न भेडसावणार नाही. कित्येक वर्षांपासून पनवेलला पाण्याच्या भीषण समस्येला तोंड द्यावे लागत आहे. यामध्ये पनवेल शहर, २९ गावे आदींसह पालिका क्षेत्रातील पाच सिडको नोडचा समावेश आहे.

सध्याच्या घडीला पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सुमारे ७० ते ८० एमएलडी पाण्याची कमतरता भासत आहे. या प्रकल्पामुळे पालिकेला सुमारे १०० एमएलडी पाणी मिळणार असल्याने पनवेलची पाण्याची समस्या मिटणार आहे. पनवेल पालिकेमध्ये ४०८ कोटी रुपयांच्या योजनेमुळे २२८ दशलक्ष लीटर पाण्याची उपलब्धता पाताळगंगा नदीतून होणार आहे. या कामामुळे पनवेल पालिकेला शंभर एमएलडी पाणी मिळणार आहे. तर एमएमआरडीए क्षेत्राला १९, जेएनपीटी बंदराला ४० एमएलडी तर सिडको मंडळाच्या क्षेत्राला ६९ एमएलडी पाणी मिळणार आहे. 

१६१ कोटी रुपये एमजेपी पंपिंग मशिनरी व इतर कामांसाठी खर्च करणार आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सिडको, महानगरपालिका, एमजेपी, एमआयडीसी आदी विविध आस्थापनांकडून पाणीपुरवठा करून देखील याठिकाणी पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पालिका क्षेत्रात अमृत योजनेंतर्गत ही कामे केली जात आहेत. २५ किलोमीटर लांबीच्या विविध जलवाहिन्यांमध्ये ९६५ व १९५० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीने पनवेल व इतर क्षेत्रात एमजेपी पाणी पुरवठा करणार आहे.

सध्या १४ एमएलडीचा तुटवडा

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील २९ गावठाणात ८ एमएलडी, पनवेल शहरात ५ ते ६ एमएलडी तर पालिका क्षेत्रातील सिडको नोडमध्ये सुमारे ७० ते ८० एमएलडी पाण्याची कमतरता भासत आहे. यापैकी सध्याच्या घडीला पनवेल शहर व २९ गावठाणात पनवेल महानगरपालिका पाणीपुरवठा करीत आहे. या ठिकाणी १४ एमएलडी पाण्याचा तुटवडा भासतोय.    - विलास चव्हाण, पाणीपुरवठा अधिकारी, पनवेल पालिका 

Web Title: Relief as Panvel's water problem will be solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.