धर्म, मंदिराच्या राजकारणाने देशात चिंतेचे वातावरण; शरद पवार यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 01:39 AM2018-12-30T01:39:33+5:302018-12-30T01:39:57+5:30
देशात धर्म, जात व मंदिराच्या नावाखाली शंका व चिंतेचे वातावरण निर्माण केले जात आहे. सरकारने सर्व घटकांना बरोबर घेऊन काम केले पाहिजे; परंतु देशाची सूत्रे हातात असणाऱ्यांनी चार वर्षांपासून सत्तेचा वापर वेगळ्या पद्धतीने सुरू केला आहे.
कळंबोली : देशात धर्म, जात व मंदिराच्या नावाखाली शंका व चिंतेचे वातावरण निर्माण केले जात आहे. सरकारने सर्व घटकांना बरोबर घेऊन काम केले पाहिजे; परंतु देशाची सूत्रे हातात असणाऱ्यांनी चार वर्षांपासून सत्तेचा वापर वेगळ्या पद्धतीने सुरू केला आहे. उदात्त भावनेने काम करण्याची सरकारची मनस्थिती नसून, त्यांच्या विरोधात पुरोगारी विचाराच्या सर्व घटकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या अभीष्टचिंतन कार्यक्रमामध्ये शरद पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले की, धर्म ही वैयक्तिक बाब आहे. प्रत्येकाला आपल्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे. घराबाहेर आपण वावरतो, तेव्हा भारतीय म्हणून विचार करण्याची गरज आहे. देशात अनेक जाती, धर्माचे लोक राहतात त्या सर्वांना आधार देण्याचे काम सरकारने केले पाहिजे. सरकारने लोकांची सेवा करण्याची भूमिका घेतली पाहिजे; परंतु सद्यस्थितीमध्ये देशाची सूत्रे हातात असणारे उदात्त भावनेने काम करण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीत. सत्तेचा वापर वेगळ्या पद्धतीने केला जात आहे. देशातील बेरोजगारीच्या विषयाकडे दुर्लक्ष केले जात आहे. विकासाच्या मुद्द्यावरून लक्ष दुसरीकडे वळविले जात आहे. या शक्तीविरोधात पुरोगावी विचारांच्या सर्व घटकांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. बाळाराम पाटील यांना त्यांचे वडील दिवंगत शेकापनेते दत्ता पाटील यांचा वारसा मिळाला आहे. दत्ता यांनी लोकहिताच्या प्रश्नावर कधीही तडतोड केली नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केले. सुनील तटकरे यांनीही बाळाराम पाटील यांच्या माध्यमातून पुरोगामी विचार कोकणात पोहोचला असल्याचे मत व्यक्त केले. आमदार जयंत पाटील आणि माजी आमदार विवेक पाटील व शेकापचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कामोठेमध्ये झालेल्या या कार्यक्रमास आमदार श्रीकांत देशपांडे, दत्तात्रेय सावंत, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, राष्ट्रवादीचे सतीश पाटील, महापालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, सभापती काशिनाथ पाटील, चंद्रकांत राऊत, कामगार नेते महेंद्र घरत, बबन पवार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
५५ लाखांचा निधी झोपडपट्टीधारकांसाठी
- शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बाळाराम पाटील यांना ५५ लाखांचा धनादेश देऊन त्यांचे अभीष्टचिंतन केले.
- या निधीचा वापर झोपडपट्टीधारकांना पंतप्रधान योजनेंतर्गत जे पैसे शासनाला द्यायचे आहेत, त्याकरिता केला जाणार असल्याचे माजी आमदार विवेक पाटील यांनी सांगितले.