नवी मुंबई : पावणे एमआयडीसीतील बावखळेश्वर मंदिर नियमित करण्यासाठी एमआयडीसी सकारात्मक असताना, उद्योगमंत्री सुभाष देसाई खोडा घालत आहेत, असा आरोप करीत नवी मुंबई धार्मिक स्थळे बचाव समितीच्या वतीने शनिवार, २७ आॅक्टोबर रोजी वाशीतील शिवाजी चौकात देसार्इंविरोधात निदर्शने केली. आंदोलनादरम्यान रस्ता रोको करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना वाशी पोलिसांनी अटक केली.पावणेमधील एमआयडीसीच्या जागेवर अनधिकृतपणे बावखळेश्वर मंदिर बांधण्यात आले आहे. या संदर्भात २०१३ सालापासून न्यायालयात लढा सुरू आहे. न्यायालयाने एमआयडीसीकडे मागविलेल्या अहवालात संबंधितांना बाजारभावाप्रमाणे जमीन देण्याची तयारी एमआयडीसीने दर्शविली होती, त्यानुसार बावखळेश्वर मंदिर ट्रस्ट मंदिराची सुमारे १२०० स्केअर मीटर जागा खरेदी करण्याच्या तयारीत होते. या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील सकारात्मक भूमिका घेतली होती; परंतु ऐनवेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ड्रफ्ट पॉलिसीमध्ये बदल करून अतिक्र मण केलेली जागा देता येणार नसल्याचे नमूद केल्याचा आरोप, नवी मुंबई धार्मिक स्थळे बचाव समितीने करत, वाशीत देसार्इंविरोधात तीव्र निदर्शने केली. या आंदोलनात नवी मुंबईतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनात देसार्इंविरोधात घोषणा देत, रास्ता रोको करण्याचा प्रयत्नही करण्यात आला; परंतु शातंतेत सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागू नये, यासाठी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.
उद्योगमंत्री देसार्इंविरोधात धार्मिक स्थळे बचाव समितीची निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 4:38 AM