नवी मुंबई : ऐरोलीतील चिंचपाडामधील कृष्णा ज्वेलर्सवर भरदिवसा पडलेला दरोडा ज्वेलर्स मालकाच्या नातेवाइकानेच टाकल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यानुसार दुकानमालकाच्या मेहुण्याला पोलिसांनी चौकशीकरिता ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यापूर्वी देखील पोलिसांनी त्याच्यावरच संशय व्यक्त करत चौकशी देखील केली होती. ऐरोली चिंचपाडा येथील कृष्णा ज्वेलर्सवर मे महिन्यात भरदिवसा अज्ञात तिघांनी दरोडा टाकला होता. गहाण ठेवलेले सोने सोडवण्याच्या बहाण्याने दुकानात प्रवेश करून दुकानात उपस्थित कामगाराला मारहाण करून त्यांनी सुमारे १० लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. ज्वेलर्सचे मालक गोदाराम गुजर हे गावी गेले असता त्यांचा मेहुणा एकटाच दुकानात होता. दुपारी बंद केलेले दुकान संध्याकाळच्या वेळेस पुन्हा उघडत असताना हा प्रकार घडला होता. ज्वेलर्समध्ये एकच कामगार असल्याचे हेरून अज्ञात तिघे दागिने सोडवण्याच्या बहाण्याने आले होते. संधी मिळताच त्यांनी दुकानातील एकट्या कामगाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत दुकानातील सोने लुटले. शिवाय पळून जाताना दुकानात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर देखील चोरून नेलेला होता. परंतु जबरी दरोडा टाकूनही त्यांनी कामगाराच्या हाताला किरकोळ दुखापत होईल असा किरकोळ घाव केला होता. त्यामुळे तपासाच्या सुरवातीपासून पोलिसांचा संशय दुकानमालकाच्या नातेवाइकाभोवतीच होता. त्याकरिता अनेकदा त्याची चौकशी देखील करण्यात आली होती. परंतु तो गुन्ह्याशी आपला संबंध नसल्याचे ठामपणे सांगून पोलिसांना चकमा देत होता. अखेर नुकतेच पुन्हा एकदा रबाळे एमआयडीसी पोलिसांनी त्याला चौकशीकरिता ताब्यात घेतल्याचे सूत्रांकडून समजते. भावजी बाहेरगावी गेल्याची संधी साधत त्यानेच ज्वेलर्सवर दरोडा घडवून आणून स्वत:वर हल्ल्याचा बनाव केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. परंतु दरोड्यात लुटीला गेलेला ऐवज त्याच्याकडून जप्त होवू शकलेला नसल्याचेही समजते. (प्रतिनिधी)
मेहुण्यानेच टाकला ज्वेलर्सवर दरोडा ?
By admin | Published: December 29, 2016 2:46 AM