लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : पेण को-आॅपरेटिव्ह अर्बन बँकेच्या १० ते २५ हजार रुपये या टप्प्यातील छोट्या ठेवीदारांना ठेवींचे पैसे परत देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे तब्बल १८ हजार छोट्या ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला असल्याची माहिती पेण अर्बन बँक ठेवीदार हक्क संघर्ष समितीचे प्रमुख आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये स्थापन करण्यात आलेल्या पेण अर्बन बँक प्रशासन मंडळाचे सदस्य नरेन जाधव यांनी ‘लोकमत’ला दिली.पेण अर्बन बँकेकडे सद्य:स्थितीत १८ हजार छोट्या ठेवीदारांना परत देण्याकरिता आवश्यक असणारी एकूण २७ कोटी रुपयांची रक्कम उपलब्ध असल्याने ती या ठेवीदारांना खात्रीने परत मिळणार आहे. पात्र ठेवीदारांना धनादेशाद्वारे बँकेच्या शाखांमधून वाटप सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती जाधव यांनी दिली. यासाठी ठेवीदारांनी आपले के.वाय.सी. नॉर्म्स पूर्ण करावेत, असे आवाहनही जाधव यांनी पात्र खातेदारांना केले आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या २० आॅगस्ट २०१५ रोजीच्या आदेशानुसार १० हजार रुपयांपर्यंत ठेव असलेल्या १३ हजार ७१४ ठेवीदारांना ४ कोटी ९५ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.
पेण अर्बनच्या छोट्या ठेवीदारांना दिलासा
By admin | Published: June 23, 2017 3:29 AM