रिमिक्समुळे तरुणाईच्या ओठावर अंभग येतील; नेरूळ येथील अभंग सोहळ्यात बच्चू कडू यांचा विश्वास
By कमलाकर कांबळे | Published: February 5, 2024 08:32 PM2024-02-05T20:32:40+5:302024-02-05T20:33:20+5:30
प्रहार जनशक्ती पक्षाने नेरूळ येथील रामलीला मैदानात आयोजित केलेल्या अभंग सोहळा कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बच्चू कडू उपस्थित होते.
कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: रिमिक्स संगीताच्या माध्यमातून तयार केलेले १५० वर्षांपूर्वीचे अभंगदेखील आजच्या तरुणांच्या ओठावर येतील, यात शंका नाही, असा विश्वास प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी नेरुळ येथे व्यक्त केला. आजची तरुणाई रॉक, पॉप आणि डिजेच्या तालावर नाचते, थिरकते. आजच्या तरुणाईच्या ओठावर कोणते गाणे आहे, त्यावरच देशाचे भवितव्य अवलंबून असते, असे साने गुरुजींनी म्हटले आहे. त्यामुळे येत्या काळात आजची तरूणाई रिमिक्स संगीतवर भजनसुद्धा गुणगुणायला लागेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रहार जनशक्ती पक्षाने नेरूळ येथील रामलीला मैदानात आयोजित केलेल्या अभंग सोहळा कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बच्चू कडू उपस्थित होते. अभंग रिपोस्ट टीमने सादर केलेला 'लाकडाचा देव त्याला अग्नीचे भेव ' सोन्याचा देव त्याला चोराचा भेव या अभंगाची रि ओढत, राजकारण्यांचा देव त्याला मतदाराचे भेव, अशी कोपरखळी मारून त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला. याप्रसंगी बच्चू कडू यांच्या हस्ते सामजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील संस्था, संघटना आणि नागरिकांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात जीवन विद्या मिशन नवी मुंबईच्या सदस्यांनी हरिपाठाद्वारे उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष प्रवीण खेडेकर आणि पनवेल शहर प्रमुख चंद्रकांत उतेकर यांच्या टीमने मेहनत घेतली.