नवीन ठाणे रेल्वे स्थानक उभारणीतील वृक्षांचा अडथळा दूर; ११४ झाडांची कत्तल, २५७ चे पुनर्रोपण
By नारायण जाधव | Published: August 24, 2023 10:03 AM2023-08-24T10:03:28+5:302023-08-24T10:05:34+5:30
भव्य चार इमारती, १२ फलाटांसह शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि खूप काही
नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: ठाण्यातील गर्दीवर उपाय म्हणून नवीन ठाणेरेल्वेस्थानक उभारण्यात येत आहे. याच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या ३७१ पैकी ११४ झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. तर २५७ वृक्षांचे पुनर्रोपण होणार आहे. रेल्वे आणि मनोरुग्णालयाची १४.३ एकर जमीन अशा एकूण २७ एकर जागेवर हे विस्तीर्ण स्थानक विविध सोयी-सुविधांनी उभे राहणार आहे.
ठाण्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणारे नवे बहुउद्देशीय ठाणे रेल्वेस्थानक चकाचक असणार आहे. रेल्वे आणि ठाणे महापालिकेच्या संयुक्त भागीदारीतून ते बांधण्यात येणार आहे. या ठिकाणी १६ ते २५ माळ्यांच्या चार इमारती, १२ फलाट, शॉपिंग कॉम्प्लेक्स, कार्यालये, रेस्टॉरंट, मेडिकल स्टोअर, दुकाने, रेल्वेची कार्यालये, कर्मचारी वसाहती राहणार आहेत. याशिवाय फेरीवाल्यांसाठी खास हॉकर्स प्लाझाची सोय राहणार आहे.
तसेच स्थानकाच्या आवारात रिक्षा, टॅक्सी स्टँडसह टीएमटी, बेस्ट, एनएमएमटीच्या बसची ये-जा करण्यासाठी खास सोयीसह दीड हजार दुचाकी आणि चारशे चारचाकी वाहनांची पार्किंगची सोय राहणार आहे. तसेच अपघात, भूकंप वा अन्य आपत्कालीन परिस्थितीत नागरिक, प्रवाशांना एअरलिफ्ट देण्यासाठी हेलिपॅडचीही सोय करण्यात येणार आहे.
१३ हेरिटेज वृक्ष
मनोरुग्णालयाकडून घेतलेल्या जागेत मोठ्या प्रमाणात वनराई आहे. यानुसार नवी इमारत बांधण्यासाठी एका हेरिटेज वृक्षासह ११४ झाडांची कत्तल करावी लागणार आहे. तर १३ हेरिटेज वृक्षांसह २५७ वृक्षांचे पुनर्रोपण करावे लागणार आहे. असे एकूण ३७२ झाडे ठाणे स्थानकाच्या नव्या इमारतीत बाधित होणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव ठाणे पालिकेने वृक्ष प्राधिकरण समितीकडे सादर केला होता. त्याला आता मंजुरी मिळाली.