सिडको नोडमधील समस्यांचा डोंगर दूर करा, शेकाप शिष्टमंडळांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 02:47 AM2017-08-29T02:47:23+5:302017-08-29T02:47:32+5:30
पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको नोडमध्ये समस्यांचा डोंगर वाढत चालला असून, सिडको प्रशासनाचे सर्वच स्तरावर या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे.
पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको नोडमध्ये समस्यांचा डोंगर वाढत चालला असून, सिडको प्रशासनाचे सर्वच स्तरावर या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. यासंदर्भात शेकापच्या शिष्टमंडळाने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी सोबत सर्व लोकप्रतिनिधी व नगरसेवक यांच्यासोबत सोमवारी बैठक घेऊन त्यांना समस्यांची माहिती दिली.
सध्या सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना, सिडको नोडमध्ये मूलभूत समस्या भेडसावत आहेत. गटारे, कचरा, सिवरेज लाइन, आदी समस्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. शहरात अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. वेळोवेळी डांबरीकरण केले जात नसल्याने अनेक नोडमध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत.
सिडकोच्या महत्त्वाच्या नोडलगत २९ गावांचा समावेश आहे. या गावांची परिस्थिती अत्यंत बिकट असून, सिडकोने शहराच्या धर्तीवर गावांमध्ये सोयी-सुविधा पुरविणे गरजेचे आहे. स्थानिकांच्या जमिनीवर सिडकोने नवी मुंबई शहर वसविले असल्याने गावात सुविधा देणे सिडकोची जबाबदारी असल्याचे आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले. येथील गरजेपोटीची घरे, मंदिरे सिडको अनधिकृत ठरवत आहे.
एकीकडे सिडको नोड पालिकेकडे हस्तांतरणाची प्रक्रि या सुरू आहे. मात्र, नोडच्या दुरवस्थेमुळे सिडको नोड पालिकेकडे हस्तांतरणापूर्वी विविध समस्या दूर झाल्या पाहिजेत, असा आग्रह शेकाप नेत्यांनी या वेळी घेतला. माजी आमदार विवेक पाटील हे
देखील या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्यासोबत या वेळी विविध नोडमधील प्रशासक उपस्थित होते. गगराणी यांनी संबंधित अधिकाºयांना शेकापने मांडलेल्या समस्यांचे सर्व्हे करण्याचे आदेश दिले. या वेळी उपस्थितांमध्ये आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार विवेक पाटील, शेकाप गटनेते प्रीतम म्हात्रे, हरेश केणी, गुरु नाथ गायकर, गोपाळ भगत, बबन मुकादम, रवींद्र भगत, अजीज पटेल आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.