नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : येत्या आठवडाभरात कधीही लाेकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर २ जानेवारी २०२४ रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांतील त्या मंत्रालयीन विभागांनी त्यांच्या संकेतस्थळांवर असलेली राज्यकर्त्यांची छायाचित्रे तत्काळ काढून आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आदेश दिले होते; मात्र अनेक महामंडळे आणि विभागांनी त्याचे पालन न करता नेत्यांची छायाचित्रे तशीच ठेवली आहेत.
यामुळे राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने सर्व प्रशासकीय विभाग आणि महामंडळांनी त्यांच्या संकेतस्थळांवर असलेली राजकीय नेत्यांची छायाचित्रे तत्काळ काढावीत, याची आठवण पुन्हा एकदा ५ मार्च २०२४ रोजी करून दिली आहे.
राज्यातील महाराष्ट्र शासनाच्या मुख्य संकेतस्थळासह ‘एमएमआरडीए’, ‘सिडको’सह अन्य महामंडळांच्या संकेतस्थळांवर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि खात्याच्या मंत्र्यांची छायाचित्रे निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतरही झळकत असल्याचे दिसत आहे.
उपजिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
राज्यातील सर्व उपजिल्हाधिकारी यांनी निवडणूक काळात आणि निवडणूक झाल्यानंतर आचारसंहिता भंगाच्या ज्या तक्रारी येतील, त्यांचे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तत्काळ निराकरण करावे; तसेच उपजिल्हाधिकारी आलेल्या तक्रारींचे निवारण आयोगाच्या निर्देशानुसार आहे की नाही, याची खातरजमा संबंधित जिल्हाधिकारी यांनी करावी, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत.
धोरणात्मक निर्णय प्रकरणी मार्गदर्शन घ्या
एखाद्या विशिष्ट धोरणात्मक निर्णय प्रकरणी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन किंवा मान्यतेची आवश्यकता असल्यास, फक्त अशीच प्रकरणे राज्य मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यामार्फतच नेमलेल्या तज्ज्ञ समितीच्या छाननीनंतरच पाठवावीत, असे आदेश देण्यात आले आहेत.