तोडगा काढा, अन्यथा परिणामांना सामोरे जा - भाई जगताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 07:17 AM2017-11-28T07:17:10+5:302017-11-28T07:17:35+5:30
ज्यांच्या खांद्यावर आम्ही इतकी वर्षे विश्वासाने मान ठेवली त्यांनीच विश्वासघात करावा, हा मानवतेशी द्रोह आहे. तुम्ही सिडको आणि सरकारचे लाभार्थी, आम्ही धारातीर्थी, असे होऊ देणार नसल्याचे ठामपणे सांगत वाहतूकदारांच्या संपावर तोडगा काढा, अन्यथा होणाºया परिणामांना सामोरे जा, असा सज्जड दम कॉँग्रेसचे प्रवक्ते आ. भाई जगताप यांनी विमानतळ ठेकेदारांना भरला.
पनवेल : ज्यांच्या खांद्यावर आम्ही इतकी वर्षे विश्वासाने मान ठेवली त्यांनीच विश्वासघात करावा, हा मानवतेशी द्रोह आहे. तुम्ही सिडको आणि सरकारचे लाभार्थी, आम्ही धारातीर्थी, असे होऊ देणार नसल्याचे ठामपणे सांगत वाहतूकदारांच्या संपावर तोडगा काढा, अन्यथा होणाºया परिणामांना सामोरे जा, असा सज्जड दम कॉँग्रेसचे प्रवक्ते आ. भाई जगताप यांनी विमानतळ ठेकेदारांना भरला.
विमानतळबाधित वाहतूकदारांना योग्य दर देत नसल्याने त्यांनी ओवाळे येथे गेल्या चार-पाच दिवसांपासून न्याय हक्कांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. सोमवारी कॉँग्रेसचे प्रवक्ते आ. भाई जगताप, जिल्हा अध्यक्ष आर. सी. घरत, विचार सेलचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल कडू, ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, पंचायत समिती सदस्या गीता म्हात्रे, नंदू मुंगाजी, तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यात, गुजरातमध्ये विकास भरकटला आहे. तसा रायगडचा विकास वेडा झाला आहे. ही जाहीर सभा नाही. परंतु टोल नाक्याविरु द्ध आंदोलन करायचे आणि पुन्हा ठेका त्यांनीच घ्यायचा, असे किती वेळ फसवत राहणार? असा प्रश्न करून तुमची कुंडली माझ्याकडे आहे, एकपासून शंभरपर्यंत यादी तयार आहे, ती जाहीरसभांमधून योग्य वेळी वाचून दाखवू अशा शब्दात भाजपाच्या स्थानिक नेत्यांची नावे टाळत जगताप यांनी चिरफाड केली.
राज्यात भूसंपादनाचा कायदा अस्तित्वात आहे. त्याची पायमल्ली केली जात आहे. सिडको आणि त्यांच्या ठेकेदारांनी त्या कायद्याचा अभ्यास करावा. ज्यांची जमीन गेली आहे, त्यांचा विकास होत नाही. प्रकल्पग्रस्तांचा विकास न झाल्याने त्यांच्यावर आंदोलनाची पाळी येते. आज जर काही पदरात हक्काने पडले नाही तर उद्याची शोकांतिका फार वाईट असेल, असा इशारा दिला. विमानतळाचे काम पूर्ण झाल्यावर त्याच्या भोवती आपल्याला झोपड्या बांधाव्या लागतील अशी परिस्थिती निर्माण होईल, असा सावधानतेचा इशारा जगताप यांनी दिला.