दाढी काढली, वेश बदलला, तरीही उचलले!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 06:31 AM2024-01-03T06:31:58+5:302024-01-03T06:37:18+5:30

पोलिसांवर हल्ला केल्यानंतर स्वतःची ओळख लपवण्यासाठी अनेकांनी दाढी काढली होती, काहींनी कपडे बदलले होते, तर काही जण रेल्वे परिसरात लपले होते.

Removed the beard, changed the face, still picked up | दाढी काढली, वेश बदलला, तरीही उचलले!

दाढी काढली, वेश बदलला, तरीही उचलले!

नवी मुंबई : वाहतूकदारांच्या रास्ता रोकोदरम्यान उलवे येथे पोलिसांवर हल्ला करणाऱ्या ३३ चालकांना पोलिसांनी अटक केली. सर्व जण शहर, तसेच राज्याबाहेरील असून अवजड वाहनांवरील चालक आहेत. पोलिसांवर हल्ला केल्यानंतर स्वतःची ओळख लपवण्यासाठी अनेकांनी दाढी काढली होती, काहींनी कपडे बदलले होते, तर काही जण रेल्वे परिसरात लपले होते.

उलवे येथे ५० ते ६० चालकांनी रास्ता रोको केल्याने वाहतूककोंडी होताच एनआरआय ठाण्याचे काही पोलिस तेथे गेले होते. यावेळी आंदोलकांनी पोलिसांना पिटाळून लावत त्यांच्यावर दगड, काठीने हल्ला केला होता. वाहनांवर दगडफेक करून तोडफोड केली होती. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना हटवले आणि रस्ता मोकळा केला. रात्री उशिरापर्यंत चालकांची धरपकड सुरू होती. हल्ला करणाऱ्यांची ओळख पटवून त्यांना पोलिसी खाक्या दाखवला जात होता. 

रात्री उशिरापर्यंत अशा ३३ आंदोलकांना अटक करण्यात आली. मंगळवारी न्यायालयात हजर केल्यावर त्यांना न्यायालयाने ५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी दिल्याचे उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले. या आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले याचा पोलिस शोध घेत आहेत. त्यांच्या हिंसक आंदोलनामागे कटकारस्थान आहे का, याबाबत एनआरआय पोलिस अधिक तपास करत आहेत. 
 

Web Title: Removed the beard, changed the face, still picked up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.