मयूर तांबडे पनवेल : तालुक्यातील खैरवाडी येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम चार ते पाच वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे. निधीअभावी हे काम रखडल्याचे बोलले जात आहे. निधी मंजूर होऊन पाण्याची टाकी केव्हा बांधून होणार, असा प्रश्न आदिवासी बांधवांकडून विचारण्यात येत आहे.राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत तालुक्यातील खैरवाडी येथे विहीर व पाण्याच्या टाकीचे बांधकाम २०१३-१४ मध्ये सुरू करण्यात आले. ३१ लाख ६२ हजार रु पयांच्या या कामाला सुरु वात झाल्यानंतर १७ लाख ९० हजार रु पयांचा खर्च करण्यात आलेला आहे. यात विहिरीचे काम पूर्ण झाले असल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र पाण्याच्या टाकीचे बांधकाम अर्धवट असल्याने ही नळपाणी योजना अयशस्वी झाली असल्याचे दिसत आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर विहिरीतून पाण्याच्या टाकीत पाणी सोडायचे आहे व त्यानंतर गावातील नागरिकांच्या घरी पाणी घरोघरी सोडले जाणार आहे. मात्र चार वर्षे उलटून गेली तरी देखील ही योजना पूर्णत्वास आलेली नाही.राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचे तीनतेरा वाजले असल्यामुळे खैरवाडी ग्रामस्थ नाराज आहेत.राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून बांधण्यात येणाºया नळपाणी योजनेत विहीर, पंप हाउस, पंपिंग मशिनरी, विहीर ते गाव पाइपलाइनचा समावेश आहे. पी. सी. जाधव या कंत्राटदाराला हे काम देण्यात आले आहे. ३७ लाख रु पये या योजनेसाठी मंजूर करण्यात आले. मात्र ५ वर्षांपासून काम अर्धवट असल्याने नागरिकांना योजनेचा काहीच लाभ झाला नाही.गेल्या चार ते पाच वर्षांपासून ही पेयजल योजना अपूर्णावस्थेत आहे. पाण्यावाचून ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. अर्धवट कामामुळे ग्रामस्थांमध्ये ठेकेदार व सुस्त प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.>निधी मिळाला तर ताबडतोब हे काम पूर्ण होईल. निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे.- आर.डी.चव्हाण,उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती, पनवेल
निधीअभावी रखडले पेयजलचे काम, निधी मंजूर तरी काम अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 3:02 AM