नवी मुंबई : तुर्भे येथील रामतनुमाता बाल रुग्णालयाच्या नूतनीकरणाच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. सद्यस्थितीला रुग्णालयाची ही इमारत मोडकळीस आल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असून जीव मुठीत धरून त्यांना उपचार घ्यावे लागत आहेत. याबाबत सातत्याने प्रशासनावर टीका होवू लागल्याने अखेर रुग्णालयाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे.तुर्भे सेक्टर २२ येथील श्री रामतनुमाता बाल रुग्णालयाची इमारत जीर्ण अवस्थेत आहे. ही इमारत १९९५ साली बांधण्यात आलेली आहे. त्यानुसार वीसहून अधिक वर्षे ही इमारत रुग्णालयासाठी वापरात आहे. मात्र मागील काही वर्षांपासून इमारतीची अवस्था दयनीय झाली आहे. अनेक ठिकाणी सिलिंगचे प्लास्टर कोसळत असून, सिलिंगमधून पाण्याची देखील गळती होत आहे. त्याशिवाय बहुतांश ठिकाणी भिंतीलाही तडे गेले आहेत. यामुळे तुर्भे व परिसरातील प्रसूतीसाठी आलेल्या महिलांच्या व लहान बाळांच्या जीविताला धोक्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे एखादी अनपेक्षित दुर्घटना घडण्यापूर्वीच रुग्णालयाच्या इमारतीची पुनर्बांधणी करण्याची मागणी होत होती. याकरिता नगरसेवक सुरेश कुलकर्णी व विद्यमान स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. अनेकदा त्यांनी प्रशासनाला धारेवर देखील धरले होते. अखेर प्रशासनाकडून या रुग्णालयाच्या इमारतीचे पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याकरिता एक कोटी ९४ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या कामासाठी तीनदा निविदा मागवण्यात आल्या असता, चार निविदा प्राप्त झाल्या आहेत. नव्याने उभारण्यात येणाºया इमारतीमध्ये तळमजल्यावर वाहनचालक कक्ष, सोनोग्राफी व एक्सरे रुम, पॅथॉलॉजी आदी सोयी पुरवल्या जाणार आहेत. तर पहिल्या मजल्यावर प्रतीक्षा कक्ष, सिस्टर रुम, स्त्रियांकरिता ओपीडी, शस्त्रक्रिया केंद्र, व दुसºया मजल्यावर देखील स्त्रियांकरिता ओपीडी, सोनोग्राफी रुम आदी सुविधा अंतर्भूत केल्या आहेत.
तुर्भेतील माता बाल रुग्णालयाचे नूतनीकरण; स्थायी समितीची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 6:09 AM