नवी मुंबई : वाशीमध्ये जुन्या इमारतींचा प्रश्न सुटणे आवश्यक आहे. इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी कोणती कागदपत्रे लागणार याची यादी महापालिका लवकर जाहीर करणार असल्याची माहिती आयुक्त रामास्वामी एन. यांनी दिली आहे.वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये आयुक्तांनी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी शहरातील ५०० पेक्षा जास्त नागरिकांनी आयुक्तांची भेट घेऊन पुनर्बांधणी, मार्केट, फेरीवाले, विद्युत पथदिवे, रस्ते, गटारे याविषयी निवेदने सादर केली आहेत. पुनर्बांधणीचा प्रश्न सुटावा यासाठी अनेक नागरिकांनी आयुक्तांना साकडे घातले. पुनर्बांधणीसाठी कोणती कागदपत्रे लागणार याविषयी एका आठवड्यात माहिती प्रसिद्ध केली जाईल. लवकरच याविषयी जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. नागरिकांशी संवाद साधल्यानंतर सेक्टर-९ मधील सेके्रड हार्ट हायस्कूल ते वाशी डेपो या सागर विहार रस्त्याला समांतर सायकल ट्रॅकच्या कामाचीही पाहणी केली. अमृत योजनेअंतर्गत विकसित करण्यात येणाऱ्या हरितक्षेत्र विकास प्रकल्पालाही भेट देण्यात आली. सेक्टर-११ जुहूगाव येथील जुन्या आरोग्यकेंद्राच्या पडीक इमारतीच्या जागी महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांच्या निवासासाठी इमारत बांधली जाणार आहे.वाशी सेक्टर-२८ मध्ये गटारे व रोडचे काम सुरू आहे. सेक्टर-१४ महात्मा गांधी कॉम्प्लेक्समध्ये प्रियदर्शनी येथील नागरिक विरंगुळा केंद्राचे बांधकाम सुरू आहे. मराठा भवनजवळील समाज मंदिराचे काम व अग्निशमन केंद्राच्या जागेचीही पाहणी केली. या वेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र पाटील, शहर अभियंता मोहन डगावकर, दादासाहेब चाबूकस्वार, अमरिश पटनिगिरे उपस्थित होते.
पुनर्बांधणीसाठीच्या कागदपत्रांची यादी महापालिका करणार प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 11:38 PM