नवी मुंबई - हेवी डिपॉझिटवर घर भाड्याने देण्याच्या बहाण्याने तब्बल ४० जणांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये संबंधितांची १ कोटी ७८ लाखांची फसवणूक झाली आहे. दरम्यान, महिलेकडून संबंधितांचे पैसे करत करण्यास टाळाटाळ होऊ लागल्यानंतर रबाळे पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे.
ऐरोली सेक्टर २ बी परिसरात हा प्रकार घडला आहे. त्या ठिकाणी हेवी डिपॉझिटवर घर भाड्याने घेण्यास इच्छुक व्यक्तींची फसवणूक झाली आहे. परिसरात राहणारे सतीश कुंभार यांच्यासह ४० जणांनी रबाळे पोलिसांकडे तक्रार केली. ते भाड्याने घराच्या शोधात असताना त्यांची दलालांमार्फत सविना गावंड नावाच्या महिलेसोबत ओळख झाली होती. या महिलेने तिच्या मालकीचे घर हेवी डिपॉझिटवर द्यायचे असल्याचे सांगितले होते. तसेच त्या जागेत बॅचलर मुली राहतात. त्यांच्यापासून २० हजार महिना भाडे मिळत असून, ते तक्रारदारांना मिळतील, असेही सांगितले होते. संबंधितांनी ३ ते ५ लाख तिला दिले.
कोणालाच दिला नाही ताबा आरोपी सविना गावंड हिने अनेकांसोबत भाडेकरार केला. प्रत्यक्षात कोणालाच जागेचा ताबा दिला नाही. यामुळे नागरिकांनी अधिक चौकशी केली असता एकच घर तिने अनेकांना भाड्याने देण्याचे आश्वासन देऊन कोट्यवधी रुपये उकळल्याचे समोर आले असून, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.