नारायण जाधव नवी मुंबई : शासनाच्या नगरविकास विभागाने गेल्या गुरुवारी काढलेला अडीच चटईक्षेत्राचा आदेश हा नवी मुंबईतील धोकादायक झालेल्या सिडकोच्या जुन्या वसाहतींसाठी नव्हे, तर फक्त शहरात बसस्थानके, रेल्वेस्थानके आणि इतर मोकळ्या भूखंडावर आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटांसाठी घरे बांधणाऱ्या प्रकल्पांनाच लागू होणार आहे. जाणकारांच्या मतांनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटांसाठी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सिडको नवी मुंबईत जी ९० हजार घरे बांधणार आहे, त्या भूखंडांवर विकसित होणाºया प्रकल्पांनाच हे अडीच चटईक्षेत्र मिळणार आहे. यामुळे सिडकोच्या जुन्या वसाहतींसह मूळ गावठाणांतील रहिवाशांची मोठ्या घरांची प्रतीक्षा कायम राहणार आहे. सध्या नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सिडकोकडे मोक्याचे भूखंड नसल्यात जमा आहेत. जे काही आहेत ते रेल्वेस्थानके, बसस्थानके आणि ट्रक टर्मिनलचे आहेत. त्यातीलच काही भूखंडांवर सिडकोने पंतप्रधान आवास योजनेची ९० हजार घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सिडको आणि नवी मुंबई महापालिकेच्या डीसी रूलमध्ये अडीच चटईक्षेत्राची तरतूद नाही. सिडकोने शहरातील सानपाडा, जुईनगर रेल्वेस्थानके परिसरासह वाशी ट्रक टर्मिनलच्या भूखंडासह इतर मोक्याच्या ठिकाणी असलेल्या भूखंडावर ही ९० हजार घरे बांधण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्यासाठीच हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
६० टक्के घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित ठेवणे बंधनकारकज्या विकासकांना किंवा बसस्थानकांसह मेट्रो आणि रेल्वेस्थानकांच्या परिसरातील भूखंडांवर अडीच चटईक्षेत्राचा लाभ घ्यायचा असेल, त्यांनी त्या प्रकल्पांतील एकूण घरांपैकी 60% घरे ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटांसाठी बांधणे गरजेचे असून ती त्या गटांसाठीच आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे.
शिवाय, अडीच चटईक्षेत्राचा लाभ घेण्यासाठी कमीतकमी चार हजार चौरस मीटरचा एकत्रित भूखंड असावा. तो १८ मीटर रुंदीच्या रस्त्यास हा भूखंड जोडलेला असावा. पुनर्विकास करताना 15% जागा खुली ठेवावी.
नाल्यापासून भूखंडाचे अंतर १५ मीटर लांब असावे, यासह सदर भूखंड रेल्वे/ मेट्रोस्थानकापासून ५०० मीटर आणि बसस्थानकापासून ३०० मीटर लांब असावा, अशा अटी आहेत.
त्या पाहिल्या तर नवी मुंबईतील सानपाडा, जुईनगर रेल्वेस्थानकांसमोरील भूखंडांसह कळंबोली, पनवेल बसस्थानक, वाशी ट्रक टर्मिनलच्या मोक्याच्या जागा गिळंकृत होणार एवढे मात्र नक्की.