घरकूल इमारतींची होणार दुरुस्ती; श्रमिकनगरमधील १७३ सदनिकाधारकांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 01:46 AM2020-01-26T01:46:07+5:302020-01-26T01:46:20+5:30
श्रमिकनगरमध्ये तीन मजल्याच्या सहा इमारती उभारण्यात आल्या आहेत.
नवी मुंबई : श्रमिकनगरमध्ये महापालिकेने २००७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आवास योजनेअंतर्गत १७३ सदनिकांचे बांधकाम केले आहे. सद्यस्थितीमध्ये दुरवस्था झालेल्या या इमारतींची दुरुस्ती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, यासाठी दोन कोटी २८ लाख रुपये खर्च होणार आहेत.
श्रमिकनगरमध्ये तीन मजल्याच्या सहा इमारती उभारण्यात आल्या आहेत. या इमारतींच्या काही भागांचे प्लास्टर निघाले आहे. आरसीसी बांधकामाच्या काही भागास तडे गेले आहेत. मलनि:सारण वाहिनी नादुरुस्त झाली आहे. बाहेरील भागाचे प्लास्टर व रंगकाम खराब झाले आहे. येथे राहणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ लागली आहे. अद्याप येथे गृहनिर्माण सोसायटीची स्थापना करण्यात आलेली नाही. यामुळे देखभालीची जबाबदारी महापालिकेची आहे. लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली होती.
इमारतींची दुरुस्ती न केल्यास येथील बांधकाम धोकादायक होण्याची शक्यता निर्माण झाली होती. यामुळे महापालिका प्रशासनाने तत्काळ दुरुस्तीचा निर्णय घेतला आहे. इमारतीमधील प्लास्टर करणे, रंगकाम, बाहेरील प्लास्टर, लादी बसविणे, दरवाजे, स्ट्रक्चरल स्टील, गेट, वॉटर प्रुफिंग, मायक्रो काँक्रीटची कामे केली जाणार आहे. स्थायी समितीने दोन कोटी २८ लाख ८० हजार रुपये खर्चाच्या कामास मंजुरी दिली आहे. आठ महिन्यांत या वसाहतींना नवीन झळाळी प्राप्त होणार असून त्यामुळे रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.