नवी मुंबई : सानपाडा रेल्वेस्थानकाखालील भुयारी मार्गातून वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. या भुयारी मार्गात खड्डे पडल्याने वाहने आदळत असून अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. याबाबत 'लोकमत'ने वृत्त प्रसिद्ध केले होते. सदर वृत्ताची दखल घेत सिडकोने भुयारी मार्गाच्या दुरुस्तीचा निर्णय घेतला असून श्री दत्त जयंतीनंतर भुयारी मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात येणार आहे. भुयारी मार्गाची दुरुस्ती होणार असल्याने वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे. सानपाडा भुयारी मार्गातून सायन-पनवेल महामार्ग, एपीएमसी, सानपाडा, वाशी, जुईनगर, नेरुळ, पामबीच मार्ग, ठाणे-बेलापूर रोड आदी परिसरात ये-जा करणाऱ्या दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असते. परिणामी, या भुयारी मार्गात ठिकठिकाणी खड्डे पडले होते.
पावसाळ्यात काँक्रीटने हे खड्डे तात्पुरते भरण्यात आले होते. मात्र पाऊस संपल्यावर पुन्हा मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून यामुळे वाहनचालकांना येथून वाहने चालवताना अनेक अडचणी येत होत्या आणि परिणामी भुयारी मार्गात वाहतूककोंडीही होत होती. तसेच दुचाकी वाहनांचा अपघात घडण्याची शक्यता देखील निर्माण झाली होती. भुयारी मार्गाच्या कामाकडे सिडको प्रशासन दुर्लक्ष करत असल्याबाबतचे वृत्त 'लोकमत'ने 7 डिसेंबर रोजी प्रसिद्ध केले होते. परिवहन समितीचे माजी सदस्य विसाजी लोके यांनी देखील भुयारी मार्गाच्या दुरुस्तीची मागणी केली होती. सिडकोने समस्येची दखल घेत भुयारी मार्गाच्या दुरुस्तीच्या कामाला मंजुरी दिली असून शनिवारी शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांच्या हस्ते भुयारी मार्गाच्या दुरुस्तीच्या कामाचे उदघाटन करून कामाला सुरुवात देखील करण्यात आली होती. मात्र श्री दत्त जयंतीच्या दिवशी या भुयारी मार्गातून पालखी मार्गक्रमण होणार असल्याने सदर काम श्री दत्त जयंतीनंतर म्हणजेच २६ डिसेंबरनंतर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सध्या पुन्हा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
एक महिना भुयारी मार्ग राहणार बंदभुयारी मार्गात दरवर्षी निर्माण होणारी खड्यांची समस्या सोडविण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून भुयारी मार्गात काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. यासाठी सदर भुयारी मार्ग सुमारे एक महिना बंद ठेवण्यात येणार असून यामुळे वाहनचालकांना सायन-पनवेल महामार्ग आणि पामबीच मार्गे वळसा मारून ये -जा कारवाई लागणार आहे.