मुख्यमंत्री येणार असल्यामुळे एपीएमसीमध्ये दुरुस्तीची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 12:35 AM2019-09-20T00:35:56+5:302019-09-20T00:35:59+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २५ सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांसह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २५ सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांसह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. यामुळे मार्केटमधील खड्डे दुरुस्ती, नालेसफाई व इतर कामे युद्धपातळीवर करण्यात येत आहेत.
महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त माथाडी कामगारांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, चंद्रकांत पाटील व राज्यातील इतर अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बाजार समिती प्रशासनाने कांदा - बटाटा मार्केटमध्ये रस्ता दुरुस्ती व इतर कामे सुरू केली आहेत. लिलावगृहाच्या परिसरातील गटारांमधील गाळ काढला जात आहे. मलनि:सारण वाहिन्या साफ करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा मागविण्यात आली होती. रस्त्यावरील खड्ड्यांचीही दुरुस्ती केली जात होती. वास्तविक कांदा बटाटा मार्केटमधील रोडची दुरवस्था झाली आहे. गटारांमध्ये गाळ साचला आहे. मलनि:सारण वाहिन्यांमधून पाण्याचा योग्यपद्धतीने निचरा होत नाही. येथील कामे करण्यासाठी व्यापाऱ्यांनी अनेक वेळा पाठपुरावा केल आहे. परंतु मार्केटची पुनर्बांधणी करण्याचे कारण सांगून दुरुस्तीची कामे केली जात नाही. मुख्यमंत्री येणार असल्यामुळे येथील कामे केली जात असल्यामुळे व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. परंतु इतर वेळीही व्यापाºयांच्या समस्या अशाचप्रकारे युद्धपातळीवर सोडविण्यात याव्यात अशीही अपेक्षाही व्यक्त केली आहे.