नवी मुंबई : राजधानी मुंबईला नवी मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरणाच्या कामापासून नंतर देखभाल-दुरुस्तीपर्यंतची कंत्राटे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत.
अशाच प्रकारे आताही सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील जुई खाडीपूल आणि तळोजा खाडीपुलाच्या रंगरंगोटीच्या कामाचे प्रत्येकी चार तुकडे करून ती कामे ठरावीक सहा ठेकेदारांना देण्याचा घाट रचल्याचे निविदांवरून दिसत आहे.
अमक्याच ठेकेदारांशिवाय इतरांच्या निविदा स्वीकारल्या जाणार नाहीत, असा फतवाच सार्वजनिक बांधकाम विभागाने काढल्याने संताप व्यक्त होत आहे. यात ठाणे, रायगड, नवी मुंबई आणि थेट सांगलीच्या ठेकेदारांचा समावेश आहे.
यानुसार निविदा क्रमांक १५ द्वारे तळोजा खाडीपुलाच्या पिचिंग आणि दुरुस्ती कामाचे चार तुकडे करून प्रत्येक काम २४ लाख ८८ हजाराचे दर्शविले आहे. या कामांसाठी मे. अनुराग मोहिते, रायगड, मे प्रथमेश राजकिरण भोईर, ठाणे, मे अजित भास्कर गर्जे, नवी मुंबई, मे. फुलचंद भोईर, नवी मुंबई आणि धनंजय रवींद्र सातपुते, सांगली यांनीच निविदा भराव्यात, अन्य ठेकेदारांच्या निविदा स्वीकारल्या जाणार नाहीत, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बहुमजली इमारत विभागाच्या कार्यकारी अभियंता कल्याणी गुप्ता यांच्या सहीने काढलेल्या निविदांवरून दिसत आहे.
तर निविदा क्रमांक १६ द्वारे जुई खाडीपुलाच्या सुपरस्ट्रक्चरला गंज प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या कामांचेही तीन तुकडे करून ते उपरोक्त ठेकेदारांसह वैष्णवी कन्स्ट्रक्शनस प्रो अविनाश जयवंत वेखंडे ठाणे आणि पंकज रेवजी पाचपुते नवी मुंबई या दोघांनीच भरावीत, असे निविदेत म्हटले आहे. यात तळोजा खाडी पुलाच्या सुपरस्ट्रक्चरला गंज प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या चौथ्या कामाचाही समावेश आहे. ही कामेसुद्धा २४ लाख ८४ हजार ते २४ लाख ८९ हजारापर्यंतची आहेत.