पोस्टाची भरती प्रक्रिया पुन्हा घ्यावी
By admin | Published: January 31, 2017 01:58 AM2017-01-31T01:58:29+5:302017-01-31T01:58:29+5:30
केंद्र शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या पोस्टाच्या पोस्टल असिस्टंट आणि सॉर्टिंग असिस्टंट या पदाच्या परीक्षा रविवारी पनवेलमधील तीन केंद्रांवर पार पडल्या. तीन केंद्रांपैकी एमजीएम
पनवेल : केंद्र शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या पोस्टाच्या पोस्टल असिस्टंट आणि सॉर्टिंग असिस्टंट या पदाच्या परीक्षा रविवारी पनवेलमधील तीन केंद्रांवर पार पडल्या. तीन केंद्रांपैकी एमजीएम केंद्रावर संगणकात बिघाड झाल्याने अनेक उमेदवारांचा हिरमोड झाला. ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र ती मान्य झाली नाही. याआधी घेण्यात आलेली परीक्षा पास होऊन पोस्टिंग देखील मिळाल्याने आता पुन्हा संगणकातील बिघाडामुळे उमेदवारांची अनेक वर्षांची मेहनत वाया जाणार असल्याने उमेदवारांनी परीक्षा संचालकांना सोमवारी पत्र लिहून परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली.
पनवेलमधील पिल्लई कॉलेज, एमजीएम कॉलेज तसेच भारती विद्यापीठ याठिकाणी राज्यभरातील जवळजवळ ४५०० आसपास उमेदवार परीक्षेसाठी आले होते. एमजीएम येथील केंद्रावर पहिल्या बॅचची परीक्षा सुरू असताना संगणकात बिघाड झाला. त्यामुळे अनेकांना परीक्षा पूर्णपणे देता आली नाही. परीक्षेसाठी नागपूर, शेगाव, नांदेड असे राज्यभरातून उमेदवार आले होते.
- २००४ मध्ये झालेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन शेगाव येथील प्रशांत तायडे या उमेदवाराची रायगड विभागात नेमणूक देखील करण्यात आली होती. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे न्यायालयाने या संदर्भात पुन्हा परीक्षा घेण्याचे आदेश दिले. मात्र पुन्हा परीक्षांमध्ये अडचण निर्माण झाल्याने अनेक उमेदवार संभ्रमात आहेत. अखेर सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येऊन हा लढा अधिक तीव्र करणार आहेत.
पोस्टल असिस्टंट व सॉर्र्टिंग असिस्टंट पदासाठी एमजीएम केंद्रावर झालेल्या तांत्रिक बिघाडाबाबत आम्ही तपासणी करीत आहोत. त्यानुसार अहवाल तयार करून यासंदर्भात निर्णय घेऊ.
- चास्कर, अधिकारी,
भरती प्रक्रिया, पोस्ट विभाग