चांद्रयान २ ची प्रतिकृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 11:47 PM2019-09-14T23:47:48+5:302019-09-14T23:47:50+5:30
आरसीएफमधून वरिष्ठ परिचालक पदावरून निवृत्त झालेल्या अरुण भोसले यांनी कोपरखैरणेमध्ये चांद्रयान-२ ची प्रतिकृती तयार केली आहे.
नवी मुंबई : आरसीएफमधून वरिष्ठ परिचालक पदावरून निवृत्त झालेल्या अरुण भोसले यांनी कोपरखैरणेमध्ये चांद्रयान-२ ची प्रतिकृती तयार केली आहे. समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला असून ही प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिक गर्दी करू लागले आहेत.
कोपरखैरणे सेक्टर ७ मधील सद्गुरू सोसायटीमध्ये अरुण भोसले राहतात. भारताच्या चांद्रयान-२ ची जगभर चर्चा सुरू आहे. चांद्रयानाची माहिती नवी मुंबईकरांना व्हावी यासाठी त्यांनी तीन आठवडे मेहनत करून चांद्रयानाची प्रतिकृती तयार केली आहे. प्रतिकृती बनविण्यासाठी पीव्हीसी पाइप, अल्युमिनीयम तारा, रंगीबेरंगी विद्युत रोषणाई, नट बोल्ट, इलेक्ट्रिक मोटर्स, एलईडी लाइट्स आणि त्यांना कंट्रोल करण्यासाठी मायक्रो कंट्रोलर संगणकाचा वापर केला आहे. कोपरखैरणेमध्ये तयार केलेले चांद्रयान पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. भोसले स्वत: सर्वांना याविषयी माहिती देत असतात. हा प्रकल्प सादर करण्यासाठी १५ हजार रुपये खर्च आला आहे.
दोन वर्षांपूर्वी अरुण भोसले यांनी इस्रो इंडियाचे मॉममंगलम नावाचे मॉडेल तयार केले होते. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले होते. केंद्र शासनाकडून त्यांना या कार्याबद्दल प्रशस्तिपत्रही देण्यात आले होते.
.मुंबईच्या नेहरू सेंटरच्या धर्तीवर नवी मुंबईत विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. शहरातून चांगले शास्त्रज्ञ निर्माण होण्यासाठी येथे सायन्स सेंटर उभे राहावे अशी अपेक्षा आहे.
- अरुण भोसले, निवृत्त अधिकारी, आरसीएफ