आयएनएस विक्रांतची प्रतिकृती मंत्रालयात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 07:26 AM2023-01-08T07:26:01+5:302023-01-08T07:26:25+5:30
ओरियन मॉल आणि संस्कार भारती यांच्या वतीने भारताच्या प्रसिद्ध युद्धनौका आयएनएस विक्रांतची हुबेहूब प्रतिकृती साकारली असून, याचे प्रदर्शन आता मंत्रालयात भरविण्यात येणार आहे
पनवेल : ओरियन मॉल आणि संस्कार भारती यांच्या वतीने भारताच्या प्रसिद्ध युद्धनौका आयएनएस विक्रांतची हुबेहूब प्रतिकृती साकारली असून, याचे प्रदर्शन आता मंत्रालयात भरविण्यात येणार आहे. पनवेलमध्ये दिवाळीत पहिल्यांदा हे प्रदर्शन भरविण्यात आले होते, अशी माहिती ओरियन मॉलचे मालक मंगेश परुळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून १२ ते २० जानेवारीदरम्यान हे प्रदर्शन भरविण्यात येणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
परुळेकर यांनी ही बाब पनवेलकरांसाठी अभिमानास्पद असल्याचे सांगत, मंत्रालयाच्या प्रदर्शनानंतर ही प्रतिकृती सीकेटी महाविद्यालयाला भेट देण्याची घोषणा यावेळी केली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी ही बाब पनवेलच्या नावलौकिकात भर घालणारी असल्याचे सांगितले. संस्कार भारतीचे ॲड. अमित चव्हाण यांनी मंत्रालयात प्रदर्शन ठेवण्यात येणार असल्याने हा पनवेलचा गौरव असल्याचे सांगितले.