CoronaVirus निगेटिव्ह असूनही २५ दिवसांपासून कोंडले; जमावाने अधिकाऱ्यांना धारेवर धरले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 09:28 PM2020-05-09T21:28:47+5:302020-05-09T21:29:05+5:30
CoronaVirus अनेकांचा रिपोर्ट निगेटिव्ह येऊनही क्वारंटाईन कालावधीत वाढ केल्याने नागरिक संतापले आहेत.
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : शहराला कोरोना व्हायरसचा विळखा बसत चालला आहे. त्यामुळे मागील दहा दिवसात रोज 40 ते 50 पॉझिटीव्ह रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे एकूण कॉरंटाईन रुग्णांची संख्या 900 च्या घरात पोचलेली आहे. परंतु उपचार घेऊन देखील पॉझिटीव्हचे निगेटिव्ह होणाऱ्यांचे प्रमाण अल्प असल्याने अनेकांचा कॉरंटाईन कालावधी वाढतच चालला आहे.
शहरातील कोरोना पॉजिटीव्ह रुग्णांची संख्या 592 इतकी झाली आहे. तर 1071 जणांना सद्यस्थितीला कॉरंटाईन सेंटर मध्ये ठेवण्यात आले आहे. वर्गवारीनुसार वाशी व पनवेलच्या इंडिया बुल्स येथे त्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामध्ये पॉजिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती, पॉजिटीव्ह आलेल्या मात्र कसलाही त्रास नसलेल्या अशा व्यक्तींचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची संख्या 600 च्या घरात होती. परंतु मागील दहा दिवसात त्यात सातत्याने वाढ होत गेली आहे. परिणामी कॉरंटाईन सेंटरमध्ये असलेल्यांची संख्या एक हजाराच्या वर गेली आहे. तर 8399 व्यक्ती घरीच कॉरंटाईन आहेत. तर अद्याप पर्यंत केवळ 75 पॉजिटीव्ह रुग्ण दुसऱ्या व तिसऱ्या चाचणीत पूर्णपणे निगेटिव्ह होऊन घरी परतले आहेत. यावरून पॉजिटीव्ह रुग्णांचे निगेटिव्ह होण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे दिसून येत आहे.
याची धास्ती कॉरंटाईन असलेल्या व दोन चाचण्या होऊनही कॉरंटाईन सेंटरमधून सुटका होत नसलेल्यांनी घेतली आहे. कॉरंटाईन सेंटरमध्ये असलेल्या बहुतांश व्यक्तींचा कॉरंटाईन कालावधी वाढत चालला आहे. यामुळे अनेकजण एक महिन्याहून अधिक कालावधीपासून बंदिस्त आहेत.
कॉरंटाईन केल्यानंतर चौदा दिवसांनी त्यांची टेस्ट घेतली जाते. त्यामध्ये निगेटिव्ह आल्यानंतर देखील दुसरी टेस्ट घेण्यासाठी पुढील पाच ते सात दिवसासाठी त्यांना तिथेच ठेवले जात आहे. परंतु दुसऱ्या टप्यातील चाचणीचा अहवाल मिळण्यासाठी अधिक कालावधी लागत आहे. तर दुसऱ्या चाचणीचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आल्यानंतर पुन्हा त्यांना त्याच ठिकाणी ठिवले जात आहे. शिवाय काहीजणांचा चौदाव्या दिवसाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यानंतर पाच ते सात दिवसांनी घेतल्या जाणाऱ्या चाचणीत पुन्हा ते पॉजिटीव्ह आढळून येत आहेत. त्यांच्यापासून कुटुंबातील इतरांना अथवा राहत्या परिसरातील व्यक्तींना संसर्ग पसरण्याचे टाळण्यासाठी त्यांचे कॉरंटाईन सेंटरमध्ये अलगीकरण होत आहे.
यामुळे अनेकांना आपला घरचा रस्ताच बंद झाल्याची भीती सतावत आहे. तर आपला रिपोर्ट निगेटिव्ह असतानाही तिथे ठेवल्याने आपल्यालाही कोरोना होईल अशी भीतीही त्यांना वाटत आहे. याच संतापात 15 ते 20 दिवसांपासून पनवेलच्या इंडिया बुल्स येथे कॉरंटाईन असलेल्या व्यक्तींनी इमारतीखाली जमाव जमवून संताप व्यक्त केला. त्यांनी तात्काळ आपल्याला घरी सोडण्याची मागणी केली. अखेर पालिका अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी त्यांची समजूत काढून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. दोन दिवसापूर्वी सीबीडीतील एका व्यक्तीने देखील त्याचा कॉरंटाईन कालावधी वाढल्याने पळ काढला होता.
कॉरंटाईन असलेल्या व्यक्तींना त्यांचा कालावधी वाढत असण्यामागची कारणे पटवून देने आवश्यक आहे. प्रत्यक्षात तसे होत नसल्याने कुटुंबापासून एकाकी पडलेल्यांकडून घुसमट व्यक्त होत आहे. तर शहरातील कॉरंटाईन व्यक्ती व पॉजिटीव्ह रुग्ण यांचा दिवसेंदिवस वाढणारा आकडा भविष्यात मोठ्या संकटाला निमंत्रण देणारा ठरू शकतो.