‘नैना’शी संबंधित प्रश्नांसाठी समिती, विकासक आणि वास्तुविशारदांना देणार प्रतिनिधित्व - सिडकोचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 04:10 AM2018-01-14T04:10:37+5:302018-01-14T04:10:48+5:30
भविष्यात बजेटमधील घरांचे डेस्टिनेशन म्हणून पाहिले जाणा-या ‘नैना’ क्षेत्राच्या विकासाला गती देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. विकासाच्या आड येणा-या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या उद्देशाने एक संयुक्त समिती गठीत करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.
नवी मुंबई : भविष्यात बजेटमधील घरांचे डेस्टिनेशन म्हणून पाहिले जाणाºया ‘नैना’ क्षेत्राच्या विकासाला गती देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. विकासाच्या आड येणाºया विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या उद्देशाने एक संयुक्त समिती गठीत करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. या समितीत सिडकोच्या वरिष्ठ अधिकाºयांसह विकासक आणि वास्तुविशारद संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश असणार आहे. ही समिती प्रत्येक १५ दिवसांनी बैठक घेऊन, विविध समस्यांचा आढावा घेऊन त्यावर उपाययोजना सुचविणार आहे.
नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्र अर्थात ‘नैना’ क्षेत्राचे नियोजन प्राधिकरण म्हणून पाच वर्षांपूर्वी राज्य सरकारने सिडकोची नियुक्ती केली. त्यानुसार या क्षेत्रातील २२४ गावांतील ४७४ चौरस किलोमीटर परिसरात पायाभूत सुविधांचे नियोजन करण्याची जबाबदारी सिडकोची आहे; परंतु विविध कारणांमुळे या प्रकल्पाच्या विकासाला अपेक्षित गती मिळताना दिसत नाही. ‘नैना’च्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून १० जानेवारी रोजी विकासक आणि वास्तुविशारद संघटनांनी बेलापूर येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवांगरे-वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी विकासकांनी ‘नैना’च्या विकासाला अडथळा ठरणाºया विविध प्रश्नांवर संवाद घडून आला.
‘नैना’चा थेट संबंध आंतरराष्ट्रीय विमानतळाशी आहे. त्यामुळे विमानतळाप्रमाणेच ‘नैना’ क्षेत्राच्या विकासासाठी सिडको आग्रही आहे. त्या दृष्टीने विविध स्तरांवर कार्यवाही सुरू आहे. विकासक आणि सिडको यांच्यात परस्पर संवाद आणि समन्वय नसल्याने ‘नैना’ प्रकल्पाविषयी जनसामान्यात संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी समन्वयाची गरज आहे. त्यासाठी लवकरच एक संयुक्त कमिटी गठीत केली जाईल. या समितीत सिडकोच्या संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांसह विकासक आणि वास्तुविशारद संघटनेच्या प्रतिनिधींचा समावेश असेल. ही समिती ‘नैना’ प्रकल्पात भेडसावणाºया विविध अडचणी व प्रश्नांचा आढावा घेईल. प्रत्येक १५ दिवसांनी समितीची बैठक घेऊन परस्पर चर्चेतून तोडगा काढला जाईल, असे या चर्चेअंती निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात ‘नैना’ प्रकल्पाच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास विकासकांनी व्यक्त केला आहे.
या कार्यक्रमाला बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह क्रेडाई एमसीएचआयचे अध्यक्ष प्रकाश बाविस्कर, वास्तुविशारद संघटनेचे अध्यक्ष शेखर बागुल, विकासक संग्राम पाटील, तसेच बांधकाम व्यावसायिक, वास्तुविशारद उपस्थित होते.