नवी मुंबई : महिलेच्या खोट्या तक्रारीवरून पतीला अडकवण्याचा प्रयत्न कोपरखैरणे पोलीस करीत असल्याचा आरोप गुन्ह्यात अटक असलेल्या व्यक्तीच्या पत्नीने केला आहे. शिवाय पतीच्या अटकेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची भेट घेण्यासाठी गेली असता, त्या ठिकाणी आपल्यासोबत लगट करण्याचाही प्रयत्न झाल्याचा त्यांचा आरोप आहे. परंतु अनेक गुन्ह्यांत सहभाग असल्याने अटक केलेल्या पतीच्या सुटकेसाठी बदनामीचा प्रयत्न होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.कोपरखैरणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी सावन वैश्य याला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केलेली आहे. ज्या महिलेने त्याच्यावर हा आरोप केलेला आहे, त्याच महिलेने अडीच महिन्यांपूर्वी त्याच्याच विरोधात फसवणुकीची तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे कोपरखैरणे पोलीस वैश्य याच्या घरी जाऊन त्याची कार ताब्यात घेऊन गेले होते. यावेळी पोलिसांनी खासगी व्यक्तीच्या माध्यमातून कार ताब्यात घेऊन चार दिवस त्याच्याकडेच ठेवली होती, असाही आरोप वैश्य यांच्या पत्नीने केला आहे. सदर प्रकारावरून सावण वैश्य व कोपरखैरणे पोलीस यांच्यात वाद निर्माण झाला होता. याची तक्रार देखील वैश्य कुटुंबीयांनी तत्कालीन पोलीस आयुक्त व उपायुक्तांकडे केली होती. यावरूनच त्यांची आयुक्तालयाबाहेर बदली झाली होती. परंतु ही बदली थांबवून पुन्हा त्याच ठिकाणी आल्यानंतर ते आपल्यासोबत सूडबुद्धीने वागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याकरिता त्याच महिलेकडून सावणविरोधात बलात्काराची तक्रार नोंदवली गेली असून, संपूर्ण प्रकारामागे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायवाड यांचा हात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. शिवाय पतीच्या अटकेनंतर गायकवाड यांच्या भेटीसाठी गेले असता त्यांनी लगट करण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. याची तक्रार विद्यमान पोलीस आयुक्तांकडे केली असून चौकशीअंती त्यांच्यावर कारवाईची मागणी वैश्य कुटुंबाने केली आहे.परंतु वैश्य कुटुंबाकडून होणारे आरोप बिनबुडाचे असल्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले. तक्रारदार महिलेने केलेल्या दोन्ही गुन्ह्यांची वैश्य याने कबुली दिलेली आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यात आर्थिक व्यवहाराची नोंद असून बलात्काराच्या गुन्ह्यात सहा हॉटेलमध्ये दोघांची नोंद निष्पन्न झालेली आहे. दरम्यानच्या काळात त्याच्यावर पूर्वीचा खंडणीचा गुन्हा देखील असल्याचे समोर आले. यामुळे वैश्य याच्यापुढील कायदेशीर अडचणी वाढत गेल्यामुळे त्याच्या सुटकेसाठी आपल्याला बदनामीचा प्रयत्न केला जात असल्याचे गायकवाड यांचे म्हणणे आहे. तसेच सदर महिला ही आपल्या मुलीसमान असल्यामुळे तिने लगट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही बिनबुडाचा असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कोपरखैरणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ठपका
By admin | Published: July 09, 2016 3:37 AM