भूमिपुत्रांच्या ३५ संघटनांचे प्रतिनिधी एकाच व्यासपीठावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 01:36 AM2018-01-16T01:36:11+5:302018-01-16T01:36:11+5:30
प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित चर्चासत्रांमध्ये ३५ संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थिती दर्शविली.
नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित चर्चासत्रांमध्ये ३५ संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थिती दर्शविली. साडेसात तास सुरू असलेल्या चर्चासत्रामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
आगरी कोळी युथ फाउंडेशनच्यावतीने कोपरखैरणेमधील शेतकरी समाज हॉलमध्ये या चर्चासत्राचे आयोजन केले होते. आमदार मंदा म्हात्रे यांनी यावेळी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. भूमिपुत्रांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. आमदार संदीप नाईक यांनीही दि. बा. पाटील यांना अपेक्षित प्रकल्पग्रस्तांसाठीच्या हिताची धोरणे शासनाकडून मंजूर करून घेण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी श्याम म्हात्रे, मनोहर मढवी, निवृत्ती जगताप, ज्ञानेश्वर सुतार, घनश्याम मढवी, मोरेश्वर पाटील, दीपक पाटील, संजीवन म्हात्रे, सूर्यकांत मढवी, महादेव मढवी उपस्थित होते.
गावठाणांचे अस्तित्व या विषयावर विविध मान्यवरांनी विचार व्यक्त केले. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी अशाप्रकारची चर्चासत्रे नियमित आयोजित केली जावीत.
चर्चासत्रामधून ज्या उपाययोजना सुचविल्या जातील त्यांची योग्यपद्धतीने अंमलबजावणी करण्यात यावी अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली. अॅड. राहुल ठाकूर यांनीही भूमिपुत्रांच्या समस्या सोडविण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत याविषयी माहिती दिली.
तब्बल साडेसात तास चर्चासत्र सुरू होते. दिवसभरात ३०० पेक्षा जास्त प्रतिनिधींनी यामध्ये सहभाग घेतल्याची माहिती युथ फाउंडेशनचे अध्यक्ष नीलेश पाटील यांनी दिली.