नवी मुंबई : सीवूड्स (पश्चिम) येथील विविध नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी माजी नगरसेवक भरत जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मागील वर्षभरापासून पाठपुरावा सुरू असूनसुद्धा कोणतीही कार्यवाही होत नसल्याने त्यांनी आता थेट महापालिका आयुक्तांना साकडे घातले आहे.सीवूड्स परिसरात अनेक नागरी प्रश्न प्रलंबित आहेत. रस्त्यांची दुरुस्ती, धोकादायक वृक्षांची छाटणी करणे, मैदान आणि उद्यानांचे सुशोभीकरण, सेंट्रल ग्रॅण्ड मॉलमध्ये पार्किंग नि:शुल्क करणे आदी जवळपास वीस मागण्यांचे निवेदन भरत जाधव यांनी आयुक्त मिसाळ यांना सादर केले आहे. नागरिकांच्या जिव्हाळ्याचे काही प्रश्न अद्यापी प्रलंबित असल्याचे जाधव यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. विशेषत: सीवूड्स उड्डाणपुलावरून शेजारच्या प्रस्तावित मॉलला जाण्यासाठी रस्ता तयार केला जात आहे. हा रस्ता भविष्यात वाहतूककोंडी आणि अपघातांना निमंत्रण देणारा आहे. त्यामुळे हे काम तत्काळ बंद करावे, अशी मागणी जाधव यांनी आयुक्तांकडे केली.या सर्व मागण्यांसंदर्भात महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून आवश्यकतेनुसार पाहणी करून सीवूड्समधील प्रलंबित प्रश्न सोडविण्याची कार्यवाही सुरू करण्याचे आश्वासन दिल्याचे जाधव यांनी कळविले आहे.जाधव यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात या वेळी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष दत्ता घंगाळे, प्रदेश सचिव (उत्तर भारतीय) विनोद उपाध्यस, वॉर्ड अध्यक्ष सुधीर जाधव, कैलास तरकसे, विष्णु पवार आदींचा समावेश होता.
सीवूड्समधील प्रलंबित नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 11:04 PM