स्मार्ट सिटीसाठी नागरी सहभाग आवश्यक
By Admin | Published: January 8, 2016 02:17 AM2016-01-08T02:17:19+5:302016-01-08T02:17:19+5:30
शहर स्मार्ट बनविण्यासाठी राज्यकर्ते, शासन, प्रशासन आणि शहरवासीयांचा सहभाग मोलाचा ठरतो. नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादातूनच
नवी मुंबई : शहर स्मार्ट बनविण्यासाठी राज्यकर्ते, शासन, प्रशासन आणि शहरवासीयांचा सहभाग मोलाचा ठरतो. नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादातूनच शहर स्मार्ट बनते,असे मत नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी व्यक्त केले.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई प्रेसक्लब आणि नवी मुंबई युनियन आॅफ जर्नालिस्ट यांच्या पुढाकाराने आयोजित स्मार्ट सिटी नवी मुंबई:संकल्पना आणि अपेक्षा या परिसंवादात ते बोलत होते. मनातील स्वार्थ, संकुचितपणा, अहंकार दूर ठेवल्यास शहरेच काय देशही स्मार्ट होईल, असा आशावाद महापौरांनी व्यक्त केला. या परिसंवादास प्रमुख वक्ते म्हणून महापालिकेचे शहर अभियंता मोहन डगांवकर, नगररचना सल्लागार सुहास गोखले, केंद्रीय वने-पर्यावरण मंत्रालय समिती सदस्य हितेन सेठी, माहिती-जनसंपर्क महासंचालनालयचे संचालक देवेंद्र भुजबळ, बिल्डर असोसिएशनचे माजी अध्यक्ष देवांग त्रिवेदी उपस्थित होते. शासकीय यंत्रणांनी राबवलेल्या मोहिमांना नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यास नवी मुंबई शहर स्मार्ट बनेल, असा विश्वास मोहन डगांवकर यांनी यावेळी व्यक्त केला.तर आपत्तीच्या प्रसंगी पोलीस, अग्निशमन दल, खाजगी स्वयंसेवी संस्थांची मदत जिथे तत्परतेने पोहचू शकते ते शहर स्मार्ट म्हणायला हरकत नाही, असे मत प्रसिध्द वास्तुविशारद हितेन सेठी यांनी मांडले. यावेळी अर्बन प्लॅनिंगचे कन्सल्टन्ट सुहास गोखले, बांधकाम व्यावसायिक देवांग त्रिवेदी व माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनीही स्मार्ट सिटीविषयी आपली मते मांडली. परिसंवादाच्या प्रारंभी नवी मुंबई युनियन आॅफ जर्नालिस्टचे अध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांनी दोन्ही संघटनांच्या माध्यमातून वर्षभर आयोजित उपक्रमांची माहिती प्रास्ताविकातून दिली. तर नवी मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज जालनावाला यांनी सूत्रसंचालन केले. निवडक श्रोत्यांकडून त्यांनी स्मार्ट सिटीबाबतची मते जाणून घेतली. (प्रतिनिधी)