पनवेल: पनवेल तालुक्यातील कामोठे गावातील 58 भाविक नेपाळमध्ये धार्मिक पर्यटनासाठी दि.16 रोजी गेले होते.गोरखपूरहून नेपाळपर्यंत सगळे व्यवस्थित पोहोचले.यावेळी लुंबीनी, पोखरा, जनकपुरी, मनोकामना या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर दि.23 रोजी काठमांडू याठिकाणी या पर्यटकांना त्याठिकाणच्या ट्रॅव्हल्स एजन्सीकडून सुरुवात झाली. तुमचे पैसे आम्हाला मिळाले नसल्याने आम्ही तुम्हाला सोडणार नसल्याचे सांगत.या प्रवाशांना एका रूम मध्ये डांबुन ठेवण्यात आले.
या 58 प्रवाशांमध्ये 35 महिला आणि 23 पुरुषांचा समावेश होता.या पर्यटकांनी गावाहून निघतानाच सर्व पैसे भरलेले होते तरी देखील या पर्यटकांना डांबुन ठेवण्यात आले. तुमच्या पर्यटन कंपनीकडून पैसे आले नाहीत. सहा लाख रुपये दिले नाहीत तर सोडणार नाही असे काठमांडू येथील ट्रॅव्हल्सचा मालक अंकीत जायस्वाल आणि त्याच्या साथीदारांनी या पर्यटकांना धमकावयला सुरूवात केली.या दरम्यान करायचा काय ? असा प्रश्न या पर्यटकांना भेडसावयाला लागला.या पर्यटकांपैकी संजय म्हात्रे म्हात्रे यांनी त्यांचे मुंबईतील मित्र अतुल भाटिया यांना फोन करून यासंदर्भात मदत मागितली.त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संपर्क क्रमांक देऊन त्या क्रमांकावर दाद मागण्याचा सल्ला म्हात्रे यांना दिला.
संजय म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेसेज करून घडलेला सर्व प्रसंग सांगितला. त्यांचा तातडीने प्रतिसाद म्हात्रे यांना आला. त्यांनी माहिती घेतली. फडणवीस यांचे खासगी सचिव दिलीप राजूरकर आणि दिल्लीतील स्वीय सहायक मनोज मुंडे यांनी या भाविकांशी संपर्क साधला.देवेंद्र फडणवीस यांच्या टीमने मूळचे नेपाळच्या संबंधित प्राधिकरणाला हि बाब कळवली.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे माजी स्वीय सहायक संदीप राणा यांना घडलेला प्रसंग सांगितला. राणा यांनी स्वत: या भाविकांची भेट घेतली व सर्व भाविकांची व्यवस्था करून विशेष बसने त्यांना गोरखपूरला पोहोचविले.
देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क साधला होता. भाविक गोरखपूरला पोहोचल्यावर तेथील जिल्हाधिकारी स्वत: भेटीला आले.त्यांनी दोन दिवस भाविकांची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली. त्यांना मुंबईपर्यंत कसे न्यायचे प्रश्न होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून गोरखपूरपासून मुंबईपर्यंत खास बोगी जोडण्याची विनंती केली. रेल्वेने त्याप्रमाणे भाविकांसाठी गोरखपूरहून मुंबईपर्यंत रेल्वेची एक बोगी आरक्षित करू दिली. दोन दिवस प्रवास करून सर्व जण दि.28 रोजी सुखरुपपणे मुंबईला पोहोचले. कामोठ्या मधील यात्री प्रवास यांच्या मार्फत या पर्यटकांनी बुकिंग केली होती.मात्र काठमांडू येथील राधाकृष्ण टूर्स ट्रॅव्हल्सच्या मार्फत आम्हाला खूप मानसिक त्रास दिल्याचा आरोप संजय म्हात्रे यांनी केला.
कामोठ्यातील ग्रामस्थही आले धावुन -हा प्रकार घडल्यावर ग्रामस्थांसमोर मोठा पेच निर्माण झाला.पुढे करायचे काय ? असा प्रश्न या पर्यटकांना पडला.यावेळी गावातील काही मंडळी मदतीला धावली.संभाजी चिपळेकर,भालचंद्र म्हात्रे,अरुण म्हात्रे,रवींद्र जोशी यांनी या पर्यटकांना तत्काळ आर्थिक मदत ऑनलाईन स्वरूपात पाठवली.या ग्रामस्थांचे देखील आम्ही आभारी असल्याचे या पर्यटकांपैकी एक असलेले नारायण नाईक यांनी सांगितले.
आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारी आहोत.त्यांच्यामुळे आम्ही सर्वजण सुखरूप आमच्या मुलाबाळासह घरी पोहचलो.आम्ही पुर्ण पैसे दिले असताना देखील आम्हाला मानसिक त्रास देणाऱ्या राधाकृष्ण टूर्स अँड ट्रॅव्हर्सवर कारवाई झाली पाहिजे.- संजय म्हात्रे (काठमांडू येथे अडकलेला पर्यटक ,कामोठे)