विकासकामांच्या कूर्मगतीचा रहिवाशांना फटका; वाहतूककोंडीची समस्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 01:10 AM2019-12-10T01:10:51+5:302019-12-10T01:12:43+5:30
रस्ते व नाल्यांच्या काँक्रिटीकरणाचे अनेक प्रकल्प अपूर्णावस्थेत
नवी मुंबई : महापालिकेच्या वतीने शहरात विविध विकासाच्या कामांचा धडाका सुरू करण्यात आला आहे. यात रस्ते, नाले, पदपथ, तसेच मलनिस्सारण वाहिन्यांच्या कामांचा समावेश आहे. यापैकी अनेक कामे अर्धवट अवस्थेत आहेत, तर काही कामांचे फलक लागले आहेत. मात्र, ते अद्याप सुरूच करण्यात आलेली नाहीत. अर्धवट अवस्थेतील या विकास कामांचा फटका शहरवासीयांना बसत आहे. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या निर्मिण झाली आहे. सुरुवातीच्या काळात वेगाने सुरू असलेल्या या कामांना अचानक ब्रेक लागल्याने यामागे काही तरी गौडबंगाल असल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे.
सानपाडा सिग्नल ते तुर्भे दरम्यानच्या सर्व्हिस रोडचे मागील अनेक महिन्यांपासून काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण करण्याची मुदत फेब्रुवारी, २0२0 पर्यंतची आहे. मात्र, अद्यापी या रस्त्याचे काम सुरूच आहे. रस्त्याच्या एकाच लेनचे काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर, अनेक महिने काम बंद ठेवण्यात आले होते. मात्र, अलीकडेच उर्वरित दुसºया लेनचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे एपीएमसीकडून येणाºया वाहनांचा सिग्नलजवळ चक्काजाम होत आहे.
विशेष म्हणजे कामाचे स्वरूप पाहता हे काम पुढील दोन महिन्यांत पूर्ण होईल, याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. वाशी सेक्टर २८ आणि २९ येथील ब्लू डायमंडकडून कोपरी सिग्नलकडे जाणारा आणि तिकडून ब्लू डायमंडकडे येणाºया रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. हे कामसुद्धा अत्यांत कुर्मगतीने सुरू असल्याचे दिसून आले आहे. मार्च, २0१९ मध्ये या कामाचा ठेका देण्यात आला आहे.नियमानुसार अकरा महिन्यांत म्हणजेच फेब्रुवारी, २0२0 मध्ये हे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र, अद्यापी पन्नास टक्के काम शिल्लक असल्याचे दिसून आले आहे. या परिसरात शाळा आणि महाविद्यालय आहे.
मार्च-एप्रिल, २0२0 मध्ये महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. त्यामुळे मागील सहा महिन्यांत चर्चेविना कोट्यवधी रूपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे. सध्या वाशी, कोपरखैरणे, घणसोली तसेच सानपाडा येथे नाल्यांच्या काँक्रिटीकरणांची कामे सुरू आहेत, तर काही भागांत पदपथांच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली गेली आहे. यातील बहुतांशी कामे सध्या अर्धवट अवस्थेत आहेत. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत ही कामे रेटण्याचा संबधित ठेकेदारांचा मनोदय असल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीनंतर प्रकल्पाचा वाढीव खर्च उकळण्याची युक्ती संबधित ठेकेदारांनी आखल्याचे बोलले जात आहे. या प्रकाराला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील संबधित अधिकाऱ्यांचा अर्थपूर्ण पाठींबा असल्याची चर्चा आहे.