रेस्क्यू टीमला दोन ठिकाणी दहा जणांना वाचविण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 11:45 PM2019-08-04T23:45:15+5:302019-08-04T23:45:25+5:30
उल्हास नदीला आलेल्या महापुरामुळे रविवारी पुन्हा एकदा पावसाने हाहाकार माजवला
नेरळ : मुसळधार पावसामुळे पाण्यात अडकलेल्या दहा जणांना वाचविण्यात यश आले आहे. दोन ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करून या व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
उल्हास नदीला आलेल्या महापुरामुळे रविवारी पुन्हा एकदा पावसाने हाहाकार माजवला. कर्जत तालुक्यातील अनेक गावांना पावसाने वेढा दिल्याने प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली होती. त्यात नेरळजवळ कोल्हारे हद्दीत असलेल्या आनंदी बागमध्ये कामगार राहून पडले होते. कामगार आतमध्ये अडकल्याची माहिती पोलीस यंत्रणेला मिळाली. माहिती मिळताच खोपोली येथील अपघातग्रस्त टीमने सकाळी ११ वाजता नेरळ गाठले.
उल्हासनदीच्या तीरावर असलेल्या त्या आनंदी फार्ममध्ये पोहचण्यासाठी नेरळ-कशेळे रस्त्याने रेस्क्यू आॅपरेशन करण्यात आले. त्यावेळी कर्जतचे तहसीलदार अविनाश कोष्टी आणि पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर यांनी रेस्क्यू टीमला सूचना देत गुरुनाथ साठलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली किमान ८०० मीटर आतमध्ये प्रवेश केला. फार्महाऊस मध्ये दोन पुरुष, चार लहान मुले आणि दोन महिला असे आठ जण असल्याची माहिती रेस्क्यू टीमकडून देण्यात आली होती. सर्वांना शर्थीचे प्रयत्न करून सुखरूप बाहेर काढण्यात आले.
त्यानंतर शेलू आणि बांधीवली भागात देखील मोठ्या प्रमाणात उल्हासनदीला आलेल्या पुराच्या पाण्याने वेधले होते. त्या पाण्याने शेलू गावातील चाळ परिसरात अडकून पडलेले रहिवाशी हे आधी आपली घरे सोडून बाहेर आल्याने अडचण कमी होती. मात्र त्यातही गणेश वेहेले आणि सिद्धार्थ कदम हे दोघे अडकून पडले होते. तहसीलदार अविनाश कोष्टी यांना माहिती मिळताच खोपोली येथील रेस्क्यू टीमला पाचारण केले. या रेस्क्यू टीमने १२वाजताच्या सुमारास शेलू गाव गाठले आणि अनेक ग्रामस्थ यांनी रेस्क्यू आॅपरेशनमध्ये सहभाग घेऊन यशस्वी केले.