इर्शाळगडाचे बचावकार्य युध्दपातळीवर सुरु; विभागीय महसूल आयुक्त महेंद्र कल्याणकर यांची माहिती

By कमलाकर कांबळे | Published: July 21, 2023 06:13 PM2023-07-21T18:13:07+5:302023-07-21T18:13:23+5:30

 डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी तातडीने सर्व प्रशासकीय यंत्रणांना आदेश दिल्याने बचाव कार्य त्वरीत व वेगाने सुरु झाले.  

Rescue work of Irshalgarh started on war footing Information of Divisional Revenue Commissioner Mahendra Kalyankar | इर्शाळगडाचे बचावकार्य युध्दपातळीवर सुरु; विभागीय महसूल आयुक्त महेंद्र कल्याणकर यांची माहिती

इर्शाळगडाचे बचावकार्य युध्दपातळीवर सुरु; विभागीय महसूल आयुक्त महेंद्र कल्याणकर यांची माहिती

googlenewsNext

नवी मुंबई : रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळ दूर्गम भागात असलेल्या इरशाळगडाच्या पायथ्याशी आदिवासी पाडयावर दरड कोसळल्याने झालेल्या दूर्घटनेत अनेक कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली गाढले गेले आहेत. ही घटना घडल्याचे कळताच कोंकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणांना बचाव कार्यासाठी आदेश दिले. डॉ. महेंद्र कल्याणकर हे स्वत: १९ जुलै रोजी रात्री दीड वाजता घटना स्थळी प्रत्यक्षात पोहोचले. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, उपविभागीय अधिकारी श्री. अजित नैराळे. खालापूर तहसिलदार अयुब तांबोळी यांनी रात्री परिस्थितीचा अंदाज घेत, बचावकार्यासाठी आवश्यक साधन सामग्री, मनुष्यबळाची तयारी केली.   

 डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी तातडीने सर्व प्रशासकीय यंत्रणांना आदेश दिल्याने बचाव कार्य त्वरीत व वेगाने सुरु झाले. एनडीआरएफचे जवान घटनास्थळी पोहचले. इरशाळवाडी पर्यंत पोहचण्याचा मार्ग सोपा नाही. निमुळता रस्ता तोही धड मातीचा नाही की धड दगडाचा नाही. डोंगरमाथ्यावरुन वेगाने येणारे पावसाचे पाणी, पायवाटेच्या खाली उतार अशा परिस्थितीत आयुक्त कल्याणकर स्वत: घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह बचाव कार्याचे नेतृत्व केले.  २४ तासाहून अधिक काळा आयुक्त डॉ. कल्याणकर आणि महसूल यंत्रणेसह इतर खात्याचे अधिकारी व कर्मचारी  त्याठिकाणी कार्यरत आहेत. दुर्घटनास्थळी वाहने पोहोचण्यात अडचण असल्याने मदत कार्य थांबू नये यासाठी माहिती असलेल्या स्थानिकांची व संस्थांची मदत घेतली जात आहे. यामध्ये युवा संघटना, महाराष्ट्र सह्याद्री ट्रेकर ग्रुप्स, यशवंती हॅकर्स, विविध ट्रेकर्सचा देखील सहभाग आहे.

आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी प्रशासन आणि खासगी यंत्रणांमार्फत युध्दपातळीवर बचावकार्य सुरु आहे. एनडीआरएफ च्या ४ तुकड्या एकूण १००जवान , टीडीआरएफ चे ८० जवान, इमॅजीका कंपनीचे ८२ कामगार तर सिडकोचे ४६०कामगार बाचाव कार्यात सहभागी झाले आहेत.  त्याचबरोबर चौक, वरोसे, खोपोली येथील ग्रामस्थ, वेगवेगळ्या एनजीओ, ट्रेकर ग्रूप मधून एकूण ९०० पेक्षा अधिक लोक बचावकार्यात सहभागी झाले आहेत. रात्रीच्यावेळी बचावकार्य चालू ठेवण्यासाठी फ्लूड लाईट्स लावण्यात आले आहेत. ५००० फूड पॅकेट्सचे वाटप करण्यात आले आहे.  या दूर्घटनेत वाचलेल्या लोकांच्या निवाऱ्यासाठी ६०कंटेनर मागविण्यात आले असून त्यापैकी ३० ते ४० कंटेनर आज घटनास्थळी पोहचले आहेत. त्यांच्या  राहण्याची तात्पूरती व्यवस्था या कंटेनर मध्ये करण्यात आली आहे. तसेच २० तात्पूरती शौचालये आणि २० तात्पूरती स्नानगृहे  तयार करण्यात आली आहेत. 

वेगवेगळया माध्यमांतून बचावकार्यासाठी लागणाऱ्या आधुनिक यंत्रसामग्री मागविण्यात आल्या आहेत. मात्र घटनास्थ्ळ डोंगर माथ्यावर असल्याने या यंत्रसामग्री घटनास्थळापर्यंत नेण्यास अडचणी येत आहेत. आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर हे स्वत: संपूर्ण बचावकार्यावर लक्ष देत आहेत. या दरड प्रलयात इरशाळावाडीतील रहिवाशांचे जनजीवन विस्कळीत होवून पशुधनाची व खाजगी मालमत्तांचे नुकसान झाले आहे. अशावेळी त्यांना आधार देवून आयुष्यात पुन्हा उभारी घेण्यासाठी समाजातील सामाजिक संस्था व नागरिकांनी आर्थिक मदत व साहित्याच्या स्वरुपात मदत करावी ,असे आवाहन कोकण विभागीय आयुक्‍त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.
 

Web Title: Rescue work of Irshalgarh started on war footing Information of Divisional Revenue Commissioner Mahendra Kalyankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.