नवी मुंबई : घाटकोपर येथे राहणाऱ्या ४५ वर्षीय महिलेने वाशी खाडीपुलावरून उडी मारून रविवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र तिने चक्कर येऊन तोल गेल्याने पडल्याचे पोलिसांना सांगितले.
हिराबेन कटारमल (४५, रा. असल्फा व्हिलेज, घाटकोपर प.) असे या महिलेचे नाव आहे. ही महिला रविवारी २९ रोजी सकाळी घाटकोपरहून कोपरखैरणेला मुलीकडे जात होती. त्या वेळी चक्कर आल्यामुळे तोल गेल्याने पुलावरून पडून खाडीत पडली, असे तिचे म्हणणे आहे. या वेळी वाशी बीट मार्शल पोलिसांनी या पुलाखाली खाडीमध्ये मासेमारी करणाऱ्या वाशी गावातील मच्छीमार महेश सुतार यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यांनी पोलिसांच्या मदतीने तत्काळ घटनास्थळी बोट नेऊन पाण्यात बुडत असलेल्या महिलेला बोटीत खेचून तिचे प्राण वाचवले.
कौटुंबिक वादातून पाऊल उचलल्याचा संशयमहिलेला दुपारी महापालिकेच्या ऐरोली रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. वाशी पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. कौटुंबिक वादातून त्यांनी हा प्रकार केला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.