कंडोमिनियमअंतर्गतची कामे रखडल्याने संताप
By admin | Published: September 27, 2016 03:18 AM2016-09-27T03:18:16+5:302016-09-27T03:18:16+5:30
राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने कंडोमिनियमअंतर्गतची विकासकामे बंद केली आहेत. या परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे स्थानिक
नवी मुंबई : राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने कंडोमिनियमअंतर्गतची विकासकामे बंद केली आहेत. या परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर कंडोमिनियमअंतर्गतच्या कामांवरील स्थगिती उठवावी, यासाठी कोपरखैरणेतील नगरसेविका मेघाली मधुकर राऊत यांनी याप्रकरणी आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे.
शहराची उभारणी करताना सिडकोने अल्प उत्पन्न घटक आणि माथाडी कामगारांसाठी विविध नोड्समध्ये मोठ्या प्रमाणात घरे बांधली आहेत. कोपरखैरणे विभागात माथाडी कामगारांची मोठ्या प्रमाणात घरे आहेत. ही घरे वेगवेगळ्या कंडोमिनियमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. पूर्वी कंडोमिनियमअंतर्गतची कामे महापालिकेच्या माध्यमातून केली जात होती. परंतु अडीच वर्षांपूर्वी राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिकेने ही कामे बंद केली आहेत. त्यामुळे कंडोमिनियमअंतर्गत सोयी-सुविधांची दैना उडाली आहे. विशेषत: रस्ते, मलनि:सारण वाहिन्या, नाले, गटारे आदी प्रकारच्या सुविधा रसातळाला गेल्या आहेत. कोपरखैरणे विभागात महापालिकेच्या १७ प्रभागांपैकी ९ प्रभाग कंडोमिनियमअंतर्गत मोडतात. त्यामुळे राज्य शासनाच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका या वसाहतींना बसला आहे. यासंदर्भात स्थानिक नगरसेवक हतबल आहेत. त्यामुळे दाद कोणाकडे मागायची, असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नगरसेविका (प्रभाग क्रमांक ३८) मेघाली मधुकर राऊत यांनी याप्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले असून यासंदर्भात निर्णय घेण्याची मागणी केली आहे. मेघाली राऊत यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना एक निवेदनदिले आहे.
सर्वाधिक कंडोमिनियम कोपरखैरणे विभागात आहेत. त्यापाठोपाठ ऐरोली, वाशी, तुर्भे, नेरूळ आदी भागात कंडोमिनियम आहेत. महापालिकेने कामे बंद केल्याने येथील रहिवाशांना विविध नागरी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी शिवसेनेचे कोपरखैरणे विभाग प्रमुख मधुकर राऊत यांनी केली आहे.