आरक्षणाचा दिग्गजांना बसला फटका; महापालिका निवडणूक सोडत जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2020 12:55 AM2020-02-02T00:55:58+5:302020-02-02T06:53:26+5:30

आजी-माजी महापौरांनाही धक्का; अनेकांचे स्वप्न धुळीस

Reservation giants hit bus; Municipal Corporation announces election | आरक्षणाचा दिग्गजांना बसला फटका; महापालिका निवडणूक सोडत जाहीर

आरक्षणाचा दिग्गजांना बसला फटका; महापालिका निवडणूक सोडत जाहीर

Next

नवी मुंबई : महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीमध्ये दिग्गजांना फटका बसला आहे. आजी-माजी महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेत्यांसह अनेक ज्येष्ठ नगरसेवकांना पर्यायी प्रभागांचा शोध घ्यावा लागणार आहे. सोडतीमुळे अनेकांचे महापालिकेमध्ये जाण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीकडे सर्वच राजकीय पक्षांचे व इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले होते. बहु-सदस्यीय पद्धत रद्द झाल्यामुळे यापूर्वीची सोडत रद्द करावी लागली होती. अखेर १ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता विष्णुदास भावे नाट्यगृहात सोडत जाहीर करण्यात आली. यापूर्वीच्या आरक्षणाच्या आधारावर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), पुरुष व महिला प्रभाग कोणते असणार याचे आरक्षण काढण्यात आले. फक्त सहा प्रभागांचे आरक्षण चिठ्ठी टाकून काढण्यात आले.

उर्वरित सर्व आरक्षण संगणकीय प्रणालीवर या पूर्वीच्या आरक्षणाच्या आधारावर जाहीर करण्यात आले. आरक्षण जाहीर होणार असल्यामुळे विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. कोणता प्रभाग आरक्षित होणार याविषयी सर्वांना उत्सुकता निर्माण झाली होती. गर्दीमुळे ११:१५ वाजल्यानंतर नाट्यगृहाच्या आवारामध्ये बाहेरील वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली.

प्रभाग आरक्षणाचा फटका अनेक दिग्गज नगरसेवकांना बसला आहे. विद्यमान महापौर जयवंत सुतार यांचा प्रभाग नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. त्यांचा प्रभाव असलेला प्रभाग ८९ ही सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे, यामुळे महापौरांना नवीन प्रभाग शोधावा लागणार आहे. माजी महापौर सुधाकर सोनावणे यांचा प्रभाव असलेले प्रभाग १९ व २० ओबीसी महिला यासाठी आरक्षित झाले आहेत, यामुळे त्यांनाही प्रभाग उपलब्ध होणार नाहीत.

विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांचा प्रभाग ओबीसी महिला वर्गासाठी आरक्षित झाला आहे. यामुळे त्यांनाही ऐरोली व दिघा परिसरातील इतर प्रभागांमधून निवडणूक लढवावी लागणार आहे. माजी उपमहापौर अविनाश लाड यांचा प्रभाग महिलांसाठी खुला झाला आहे. माजी सभागृहनेते विठ्ठल मोरे यांचा प्रभागही ओबीसीसाठी आरक्षित झाला आहे. सानपाडा परिसरामध्ये वर्चस्व असलेले शिवसेनेचे नगरसेवक सोमनाथ वास्कर यांचे दोन्ही प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाले आहेत.

महापालिका आरक्षण सोडतीविषयी आक्षेप

महापालिकेचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये तुर्भे नाका येथील खाजा मिया पटेल यांनी आक्षेप घेऊन आगोदरच आरक्षण ठरले असल्याचा आरोप केला. काँगे्रसचे रवींद्र सावंत, शिवसेनेचे विठ्ठल मोरे यांनीही काही प्रश्न उपस्थित केले. उपस्थितांमधील अनेकांनी कोणते प्रभाग आरक्षित होणार हे अगोदरच निश्चित झाले असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

महापालिकेचे आरक्षण नियमाप्रमाणे व पारदर्शीपणे करण्यात आले आहे. आरक्षणाविषयी कोणाला आक्षेप असतील तर त्याविषयी ३ ते १० फेब्रुवारीदरम्यान हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. १२ फेब्रुवारीला या हरकतींचे विवरण राज्य निवडणूक आयोगास सादर करण्यात येणार आहे.
- अण्णासाहेब मिसाळ,आयुक्त, महानगरपालिका

यांना होणार लाभ

माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, निशांत भगत, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, वाशीतील भाजपचे पदाधिकारी विजय वाळूंज, भाजपचे जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, माजी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी, शिवराम पाटील यांना त्यांच्या हक्काच्या प्रभागांमधून निवडणूक लढता येणार आहे.

यांना बसणार फटका

महापौर जयवंत सुतार, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, अनंत सुतार, संजू वाडे, एम. के. मढवी, अविनाश लाड, द्वारकानाथ भोईर, किशोर पाटकर, सोमनाथ वास्कर, नामदेव भगत, रवींद्र इथापे, माजी महापौर सुधाकर सोनावणे, मनीषा भोईर या ज्येष्ठ नगरसेवकांना स्वत:चा प्रभाग सोडून इतर पर्याय शोधावा लागणार आहे किंवा निवडणुकीपासून दूर राहवे लागणार आहे.

आरक्षण भाजपच्या पथ्यावर

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरक्षणाचा सर्वाधिक फटका शिवसेनेला बसला आहे. ऐरोली व दिघा हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात आहे. येथे पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक असून त्यांचे प्राबल्य असलेले प्रभाग आरक्षित झाले आहेत. वाशी, सानपाडा, नेरुळमध्येही शिवसेनेच्या काही ज्येष्ठ नगरसेवकांना आरक्षणाचा फटका बसला असून त्याचा अप्रत्यक्ष लाभ भाजपला होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आरक्षित प्रभागांचा तपशील पुढीलप्रमाणे

सर्वसाधारण
१, ६, १३, १५, २४, ३४, ३६, ३७, ३८, ३९, ४४, ४५, ४७, ५१, ५२, ५३, ५६, ६२, ६३, ६९, ७०, ७१, ७२, ७३, ७६, ७८,७९, ८०, ८५, ८७, ८८, ९०, ९४,९६

सर्वसाधारण महिला
४, ५, ११, १४, १८, २२, २३, २६, २८, २९, ४०, ४२, ४६, ४९, ५०, ५५, ५७, ५८, ५९, ६०, ६१, ६७, ६८, ७४, ७५, ८४, ८९, ९२, ९३,९५, ९७, १०३, १०७, १०९,११०

ओबीसी
२, ३३, ३५,४१,४३, ५४, ६४, ६५, ६६, ७७, ८३, ८६, ९१, ९८, ९९,

ओबीसी महिला
७,८,९, १२, १९, २०, २१, २७, ८१, ८२, १००, १०२, १०४, १०५, १११

अनुसूचित जाती
३, १०, १७, ४८, १०१,

अनुसूचित जाती महिला
१६, ३०, ३२, १०६, १०८

अनुसूचित जमाती महिला
२५

अनुसूचित जमाती पुरुष

३१

Web Title: Reservation giants hit bus; Municipal Corporation announces election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.