सीबीडीतील आरबीआय कार्यालयाची सुरक्षा वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 01:56 AM2019-05-02T01:56:21+5:302019-05-02T01:56:57+5:30
घातपाताची शक्यता : प्रवेशद्वारावर बेवारस वाहनांचा खच; संबंधित प्राधिकरणाचे सुरक्षेकडे दुर्लक्ष
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : सीबीडीतील आरबीआयच्या कार्यालयासमोरच बेवारस वाहनांचा खच साचला आहे. यावरून रस्त्यालगतची बेवारस वाहने हटवण्यातील प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. मात्र, या प्रकारामुळे आरबीआयच्या सुरक्षेतील त्रुटी उघड होत आहेत.
शहरातील रस्त्यांलगत तसेच मोकळ्या जागेत वर्षानुवर्षे पडून राहणारी वाहने डोकेदुखी ठरत आहेत. अशा वाहनांमुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. शिवाय, या वाहनांचा घातपातासाठीही वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अथवा एखाद्या गुन्ह्यात वापरल्यानंतर ती वाहने उभी केल्याचीही शक्यता असू शकते. सद्यस्थितीला शहराच्या प्रत्येक नोडमध्ये जागोजागी अशी भंगार अवस्थेतील संशयास्पद वाहने दिसून येत आहेत. त्यात आरबीआयच्या आवाराचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, पोलीस मुख्यालयासमोरच आरबीआयचे मुख्य कार्यालय असतानाही, त्या ठिकाणच्या बेवारस वाहनांना हटवण्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. मात्र, या प्रकारातून आरबीआयच्या सुरक्षेकडे होणारे दुर्लक्ष भविष्यात एखाद्या गुन्हेगारी कृत्याला कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेले अनेक महिन्यांपासून त्या ठिकाणी काही वाहने संशयास्पदरीत्या उभी आहेत. विशेष म्हणजे, त्याच ठिकाणी आरबीआयच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या काही पोलिसांच्या दुचाकीही उभ्या असतात. मात्र, त्यापैकी एकालाही त्या बेवारस वाहनांचे गांभीर्य लक्षात येत नसल्याचेही आश्चर्य व्यक्त होत आहे. सद्यस्थितीला मुंबईपेक्षाही नवी मुंबईतील आरबीआयच्या कार्यालयाला अधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. नोटाबंदीच्या काळातही ती अधिक प्रकाशात आली होती. शहरात बहुतांश ठिकाणी संशयास्पदरीत्या उभी असलेली बेवारस वाहने पाहायला मिळत
आहेत. त्यामध्ये दुचाकींसह कारचाही समावेश आहे. मात्र, संवेदनशील ठिकाणी उभी असलेली वाहने हटवण्याबाबत कार्यवाही होताना दिसत नाही.
आवारातच बेवारस वाहने
अन्यथा एखाद्या माथेफिरूकडून अथवा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीकडून या बेवारस वाहनांच्या आडून गुन्हेगारी कृत्य केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, पोलीस मुख्यालयासमोरील व आरबीआयच्या आवारातीलच बेवारस वाहने हटवण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा संताप सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.