पनवेल : महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने नागरी वस्तीत ज्वालाग्राही आणि स्फोटक रसायने हाताळण्यास बंदी घातली आहे. मात्र, त्यानंतरही पळस्पे फाट्यावरील जेकेएस इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीच्या सीसीआयएलच्या गोदामात ज्वालाग्राही स्फोटक रसायनांचा साठा करण्यात आला आहे. ज्वलनशील पदार्थांमुळे कोळखे पेठ, कोळखे आणि पळस्पे फाटा येथील नागरी वस्तीला धोका निर्माण झाल्याने याप्रकरणी ग्रामस्थांच्या वतीने संघर्ष समितीकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. त्यानंतर संघर्ष समितीच्या निवेदनाची दखल घेत तहसीलदार आणि नवी मुंंबई पोलीस आयुक्तालयाने गोदामातील ज्वालाग्राही रसायने हाताळणी आणि साठा करण्यास त्वरित बंदी घालण्याची मागणी केली आहे. कोळखे ग्रामपंचायतीने केवळ बांधकामाला परवानगी दिल्यानंतर जेकेएस इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीने पळस्पे फाटा येथे उभारलेल्या सीसीआयएलच्या गोदामात ज्वलनशील आणि स्फोटक ज्वालाग्राही रसायनांचा साठा करण्यात आला असून, अकुशल कामगारांकडून त्याची हाताळणी सुरू आहे. या साठ्यातील रसायनांचा स्फोट झाल्यास भोपाळपेक्षा भयानक दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवून काही समाजसेवकांनी कंपनीला विरोध करत मुख्यमंत्री, तहसीलदार, नवी मुंबई पोलीस आयुक्त, महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाशी पत्रव्यवहार केला आहे. माया सुरते आणि त्यांचे सहकारी ग्रामपंचायतीचे सदस्य मोहन डाकी तसेच पंचायत समितीचे सदस्य भरत म्हात्रे आदींनी कंपनीविरोधात आवाज उठविला आहे. त्यांनी शेकडो ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांना देऊन साडेसहा हजार लोकवस्तीच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या गोदामातून रसायनांच्या साठ्यास बंदी घालण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र दिनी कोळखे ग्रामपंचायतीची याबाबतीत ग्रामसभा होणार असून, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कंपनीला विरोध नोंदविण्याचे ठरवले आहे. गेल्याच आठवड्यात ग्रामसभा बोलाविली होती. संख्येअभावी ती रद्द करून सोमवारी पुन्हा बोलाविण्यात आली आहे.
पळस्पे येथे सीसीआयएलच्या गोदामात ज्वलनशील रसायनांचा साठा
By admin | Published: May 01, 2017 6:47 AM