सिडकोतील प्रमुख पदांचा खांदेपालट; एस. एच. महावरकर दक्षता अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 01:29 AM2020-09-17T01:29:13+5:302020-09-17T01:29:32+5:30
सिडकोच्या सेवेत तीन सह व्यवस्थापकीय संचालक आणि एक पोलीस महासंचालक दर्जाचे मुख्य दक्षता अधिकारी, असे पाच आयएएस दर्जाचे अधिकारी कार्यरत आहेत.
नवी मुंबई : राज्यातील सर्वांत श्रीमंत महामंडळ म्हणून सिडकोची ओळख आहे, टाळेबंदीच्या काळात सिडकोचे कामकाज ठप्प झाले आहे. असे असतानाही राज्य सरकारने सिडकोत कार्यरत असलेल्या आय.ए.एस. दर्जाच्या सर्वच अधिकाऱ्यांच्या बदल्या करून त्या ठिकाणी नवीन नियुक्त्या केल्या आहेत.
सिडकोच्या सेवेत तीन सह व्यवस्थापकीय संचालक आणि एक पोलीस महासंचालक दर्जाचे मुख्य दक्षता अधिकारी, असे पाच आयएएस दर्जाचे अधिकारी कार्यरत आहेत. माजी व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांची गेल्या महिन्यात बदली करण्यात आली. त्यांच्या रिक्त जागेवर डॉ. संजय मुखर्जी यांची नेमणूक करण्यात आली आहे, तर सह व्यवस्थापकीय संचालक (१) डॉ. प्रशांत नारनवरे आणि सह व्यवस्थापकीय संचालक (२) अशोक शिनगारे यांची गेल्या आठवड्यात बदली करण्यात आली आहे. अशोक शिनगारे यांच्या जागेवर कैलाश शिंदे या सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
एस. एच. महावरकर दक्षता अधिकारी
काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या सह व्यवस्थापक संचालक (३) या पदावर एस. एस. पाटील यांची तर नागपूर पोलीस आयुक्तालयात अप्पर पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असलेले एस. एच. महावरकर यांची सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.