घणसोलीत मलनिःसारण वाहिन्यांवर निवासी बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 02:00 AM2021-03-11T02:00:07+5:302021-03-11T02:00:18+5:30

उद्यानाची भिंतही बळकावली : दूषित पाणी येते उद्यानात

Residential construction on Ghansoli sewerage lines | घणसोलीत मलनिःसारण वाहिन्यांवर निवासी बांधकाम

घणसोलीत मलनिःसारण वाहिन्यांवर निवासी बांधकाम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी मुंबई : घणसोली येथील २० हून अधिक घरांच्या मलनिःसारण वाहिन्यांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यासाठी उद्यानाच्या भिंतीचा आधार घेण्यात आला आहे. यामुळे मलनिःसारण वाहिन्या नादुरुस्त होऊन त्यामधील दूषित पाणी उद्यानात साचत आहे. या अतिक्रमणावर कारवाई करण्याऐवजी पालिका अधिकारी चालढकल करीत आहेत. 

महापालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्चून उद्याने विकसित केली जात आहेत. मात्र अनेकदा उद्यानांची निगा राखली जात नसल्याचे पाहायला मिळते. परंतु घणसोली येथे उद्यान सुस्थितीत असतानादेखील उद्यानाच्या भिंतीवर झालेल्या अतिक्रमणामुळे त्याला अवकळा आल्याचे पाहायला मिळत आहे. घणसोली सेक्टर ४ येथील भूखंड क्रमांक २१४ वर विकसित उद्यानाच्या ठिकाणी हा प्रकार पाहायला मिळत आहे. या उद्यानाच्या लगतच काही निवासी सोसायट्या आहेत. त्यामधील उद्यानाकडील बाजूच्या रहिवाशांनी उद्यानाच्या भिंतीवरच अतिक्रमण केले आहे. उद्यान व सोसायटीमधील खुल्या जागेत असलेल्या मलनिःसारण वाहिन्यांची जागाच त्यांनी बळकावली आहे. सुरुवातीला काही व्यक्तींनी एका विकासकाला हाताशी धरून हे बांधकाम करून घेतले. यानंतर २ घरे वगळता सर्वच रहिवाशांनी खासगी विकासकामार्फत उद्यानाच्या भिंतीवर अतिक्रमण करून तिथली मलनिःसारण वाहिन्यांची जागा हडपली आहे. मागील दोन वर्षांत यासंदर्भात अनेकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या. त्यानंतर अतिक्रमण विभागाकडून पालिकेच्याच उद्यानावर झालेल्या अतिक्रमणाकडे डोळेझाक करण्यात आली. परिणामी, दुरुस्तीअभावी सध्या तिथल्या मलनिःसारण वाहिन्या तुंबण्याचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे मलमिश्रित दूषित पाणी उद्यानात साचत आहे. 

आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष
उद्यानाचा काही भाग पूर्ण दूषित झाल्याने कर्मचाऱ्यांना सफाई करणे अवघड झाले आहे. तर साचलेल्या सांडपाण्यामुळे जमीन ओलसर होऊन उद्यानाची भिंत  कोसळण्याच्या स्थितीत आहे. यानंतरही अधिकाऱ्यांकडून अतिक्रमणाला पाठीशी घालून उद्यानावर होणारा खर्च व्यर्थ घालविण्याचे काम होत आहे. त्यामुळे पालिका आयुक्तांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
 

Web Title: Residential construction on Ghansoli sewerage lines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.