वाढीव वीजबिलाच्या विरोधात रहिवासी आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 12:03 AM2020-06-23T00:03:23+5:302020-06-23T00:16:56+5:30
महावितरणच्या या व्यावसायिक भूमिकेच्या विरोधात शहरवासीयांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, वाढीव बिले कमी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
नवी मुंबई: अगोदरच लॉकडाउनमुळे त्रस्त झालेल्या नवी मुंबईकरांना महावितरणने वाढीव बिलाचा शॉक दिला आहे. कोणतेही रीडिंग न घेता, सरसकट वाढीव बिले पाठविली आहेत. अगोदरच आर्थिक कोंडीत असलेल्या ग्राहकांना तीन महिन्यांची बिले एकत्रित भरण्यास सांगितल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. महावितरणच्या या व्यावसायिक भूमिकेच्या विरोधात शहरवासीयांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, वाढीव बिले कमी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे, तसेच शासकीय कार्यालये बंद होती. त्यामुळे या काळात महावितरणकडून विद्युत मीटरची रीडिंग घेण्यात आली नाही, परंतु आता तीन महिन्यांची एकत्रित बिले पाठविण्यात आली आहेत. ही बिले सरासरीपेक्षा अधिक असल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. या संदर्भात बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी सोमवारी महावितरणचे वाशी विभागाचे कार्यकारी अभियंता श्यामकांत बोरसे यांची भेट घेऊन वाढीव बिले तातडीने कमी करण्याची मागणी केली, तसेच तीन महिन्यांची एकत्रित बिले भरणे नागरिकांना शक्य होणार नाही. त्यामुळे एकत्रित बिले न देता, रीडिंग घेऊन नियमाप्रमाणे प्रति महिन्याचे बिल देण्यात यावे, तसेच त्यावरील येणारे दंड, व्याज व अधिभार हे माफ करून एकूण येणारे बिल
२४ हप्त्यांमध्ये वर्ग करून आकारले जावे, अशी मागणी मंदा म्हात्रे यांनी केली आहे. या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोनल छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान, या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन देणार असल्याचे मंदा म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे. विद्युत देयकांसंदर्भात शासनाचा धोरणात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत विद्युत देयके वितरित करू नयेत, अशी मागणीसुद्धा त्यांनी यावेळी केली. या सर्व मागण्या वरिष्ठाकडे मांडून, त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन कार्यकारी अभियंते श्यामकांत बोरसे यांनी दिले. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी स्थायी समिती सभापती संपत शेवाळे, भाजपा महामंत्री विजय घाटे, उदयवीर सिंग आदी
उपस्थित होते.