पावसाळ्यात पूरस्थिती येण्याची नागरिकांना भीती; सीईटीपीच्या वाहिन्यांसाठी कासाडी नदीत भराव!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 10:00 AM2023-12-10T10:00:17+5:302023-12-10T10:01:10+5:30

रोडपाली परिसरामध्ये पाणी कमी असल्याने येथे मशिनरी उभ्या करण्यासाठी एजन्सीकडून थेट कासाडी नदीमध्ये मोठा भराव टाकण्यात आला आहे.

Residents are afraid of floods during monsoons; Filling the Kasadi River for CETP channels! | पावसाळ्यात पूरस्थिती येण्याची नागरिकांना भीती; सीईटीपीच्या वाहिन्यांसाठी कासाडी नदीत भराव!

पावसाळ्यात पूरस्थिती येण्याची नागरिकांना भीती; सीईटीपीच्या वाहिन्यांसाठी कासाडी नदीत भराव!

अरुणकुमार मेहत्रे

कळंबोली : तळोजा एमआयडीसीतील कारखान्यातून येणारे प्रक्रिया झालेले सांडपाणी वाहून नेण्यासाठी नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रोडपाली परिसरामध्ये पाणी कमी असल्याने येथे मशिनरी उभ्या करण्यासाठी एजन्सीकडून थेट कासाडी नदीमध्ये मोठा भराव टाकण्यात आला आहे. मात्र हा भराव तात्पुरता असल्याचे एमआयडीसीकडून सांगण्यात आले आहे.

तळोजा एमआयडीसीमधील कारखान्यातून बाहेर निघणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सीईटीपी प्रकल्प आहे. सीईटीपीमध्ये नवीनीकरण करण्यात आले आहे. येथील यंत्र बदलण्यात आले आहेत. यासाठी औद्योगिक विकास महामंडळाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र प्रक्रिया झालेले एमआयडीसीचे सांडपाणी वाघिवली खाडीमध्ये बाहेर सोडले जाते. हे पाणी वाहून नेणारी पाइपलाइन ३० वर्षे जुनी झाली आहे. त्याला अनेक ठिकाणी लिकेज असल्याने हे पाणी कासाडी नदीमध्ये जाऊन पाण्याचे प्रदूषण होत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या बिल्डिंगमध्ये दुर्गंधी येऊन श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत आहे. तळोजा एमआयडीसीतील या प्रदूषणाबाबत माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी थेट राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली होती. त्याचबरोबर नागरिकांकडून सुद्धा या विरोधात कायम आंदोलन करण्यात आले होते.

कासाडी नदीमध्ये मशीन उभ्या करण्यासाठी भराव टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी एमआयडीसीने सीआरझेड आणि मेरीटाईम बोर्डकडून परवानगी घेतली आहे. यामध्ये कांदळवनाचे नुकसान होणार नाही; याची खबरदारी घेण्यात आली आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण करून नदीचे पात्र पूर्वीसारखे करून देणार आहे.

- सुभाष कुंभार, सहायक अभियंता, एमआयडीसी तळोजा

३६  महिन्यांची एजन्सीला मुदत!

एकूण आठ किलोमीटरच्या जलवाहिन्या टाकण्यासाठी एजन्सीला ३६  महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्याचबरोबर रोडपाली पट्ट्यामध्ये मशीन उभ्या करण्यासाठी करण्यात आलेला भराव फक्त सहा महिन्यांच्या कालावधीसाठी असणार असल्याचे एमआयडीसीकडून सांगण्यात आले. त्या अगोदरच हे काम पूर्णत्वास येणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

रोडपाली भागात पाण्याची पातळी कमी

निविदा पद्धतीने हे काम एमईपीएल गॅन जेव्ही या कंपनीला देण्यात आले आहे. एकूण ६३०  व्यासाच्या नवीन जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत. याअगोदर कामोठे खाडीत बोटीमध्ये मशिनरी ठेवून हे काम केले आहे.

मात्र रोडपाली भागात पाण्याची पातळी कमी आहे. ओहोटीमुळे पाणी खाडीत वाहून जाते, या कारणाने मशीन ठेवण्यासाठी या एजन्सीने साधारणपणे २०० मीटरचा भराव कासाडी नदीच्या मध्यभागी केला आहे. यामुळे पावसाचे पाणी येऊन पूरस्थिती निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

हा भराव पाइपलाइन टाकण्यापुरता असल्याचे एमआयडीसीकडून सांगण्यात आले. त्यामुळे कोणतीही आपत्ती होणार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Web Title: Residents are afraid of floods during monsoons; Filling the Kasadi River for CETP channels!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.