तळोजातील रहिवाशांचा सिडकोविरोधात हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 12:15 AM2018-12-08T00:15:40+5:302018-12-08T00:15:56+5:30
तळोजा वसाहतीमधील अपुरा पाणीपुरवठा, कचरा, खड्डेमय रस्ते या संदर्भात शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष या महाआघाडीने शुक्रवारी सिडकोविरोधात हल्लाबोल आंदोलन केले.
पनवेल : तळोजा वसाहतीमधील अपुरा पाणीपुरवठा, कचरा, खड्डेमय रस्ते या संदर्भात शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष या महाआघाडीने शुक्रवारी सिडकोविरोधात हल्लाबोल आंदोलन केले. हजारोंच्या संख्येने वसाहतीमधील रहिवाशांनी एकत्र येऊन सिडकोविरोधात घोषणाबाजी केली. तळोजा वसाहतीमध्ये सुरू असलेला सिडकोचा हजारो घरांचा गृहप्रकल्प या वेळी आंदोलनकर्त्यांनी बंद करण्याचा प्रयत्न केला.
तळोजा वसाहतीमध्ये सध्याच्या घडीला अनियमित व अपुरा पाणीपुरवठा ही मोठी समस्या आहे. या मागणीसाठी रहिवाशांनी मोर्चे, आंदोलन करूनदेखील सिडको प्रशासन याबाबत ठोस निर्णय घेत नसल्याने सिडकोविरोधात हल्लाबोल आंदोलन करीत सिडकोचे सर्व प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा या वेळी देण्यात आला होता. सिडकोने आंदोलनाचा धसका घेत तळोजा वसाहतीमधील सर्व समस्या मार्गी लावल्या जातील, असे पत्र स्थानिक नगरसेवक हरेश केणी यांना दिले होते. मात्र, प्रत्यक्षात ठोस निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत सिडकोविरोधात लढा सुरूच राहणार असल्याचे सांगत, नियोजित आंदोलन शुक्र वारी सुरूच ठेवण्यात आले. शेकापचे नेते माजी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चाला हजारोच्या संख्येने रहिवासी उपस्थित होते. या वेळी आमदार बाळाराम पाटील, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष नगरसेवक सतीश पाटील, काँग्रेसचे आर. सी. घरत, सुदाम पाटील, समाजवादी पक्षाचे अनिल नाईक, नगरसेवक हरेश केणी, नगरसेवक गुरु नाथ गायकर, नगरसेवक प्रमोद भगत, नगरसेवक अरविंद म्हात्रे, फारुक पटेल, मनोज गांधी, त्र्यंबक केणी, बळीराम नेटके, बी. ए. पाटील, तळोजे वसाहतीमधील नागरिक उपस्थित होते.
या वेळी सिडको उभारत असलेल्या गृहप्रकल्पातील कार्यालयात सिडको अधिकाऱ्यांसोबत आंदोलनकर्त्यांची बैठक पार पडली. बैठकीत सिडको अधिकाºयांनी तळोजा वसाहतीमधील विविध प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन या वेळी दिले.
आंदोलनाची दखल घेत सिडकोमार्फत शहरातील रखडलेले प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावले जातील, असे आश्वासन देण्यात आले. प्रकल्पात रेल्वे फाटकावरील भुयारी मार्गाचे काम सात महिन्यांत पूर्ण केले जाईल. खारघर ते पेंधर दरम्यान उड्डाणपूल लवकरच सुरू केला जाईल, तळोजा वसाहतीत प्रवेश करण्यासाठी रेल्वे फाटकावरील भुयारी मार्ग एका महिन्यात कार्यान्वित करण्यात येईल, तळोजा वसाहतीमधील दफनभूमी, स्मशानभूमी संदर्भात नियोजित जागेवरील कामांना लवकरच सुरु वात होईल, याकरिता महिनाभरात नव्याने टेंडर काढण्यात येणार असल्याचे या वेळी सिडको माध्यमातून दिलेल्या लेखी पत्रात स्पष्ट केले आहे.