नवी मुंबई : कोपर खैरणेत विविध भागामध्ये रात्रीच्या वेळी अचानक होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे नागरिकांना ठसका लागत आहे. हवेतील रसायनी घटकामुळे हा प्रकार घडत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असतानाही प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या हातघाडीबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
मागील काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी कोपर खैरणेतील रहिवास्यांना हा त्रास सहन करावा लागत आहे. रात्री १० नंतर घराबाहेर पडल्यास प्रदूषित हवेमुळे नागरिकांना ठसका लागत आहे. खैरणे, बोनकोडे, सेक्टर ५, १०, १२ व इतर काही परिसरातील नागरिकांना हा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. अचानक होणाऱ्या ठसक्याच्या त्रासामुळे काहींनी पोलिसांकडे देखील तक्रार केली होती. यावेळी पोलिसांनी देखील आपणही या त्रासाला सामोरे जात असल्याचे सांगितले.
यापूर्वी पावणे गाव, वाशी परिसरात रात्रीच्या वेळी अचानक हवा प्रदूषित होऊन रस्त्यावर धुरके पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. त्यातच दोन दिवसांपासून कोपर खैरणे परिसरातल्या प्रदूषित हवेमुळे नागरिकांना ठसका लागत आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील काही कंपन्यांना प्रदूषित वायू हवेत सोडण्याची छुपी मुभा दिली जात असल्याचा संशय नागरिक व्यक्त करत आहेत. मात्र या प्रकारातून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ हा ओट असल्याचा संताप रहिवाशी सहदेव घोलप यांनी व्यक्त केला आहे. बुधवारी रात्री ते पाहुण्यांसह फाम परिसरात फेरफटका मारत असताना त्यांना ठसक्याचा त्रास होऊ लागला. यावेळी परिसरातील इतरही नागरिकांना ठसका येत असल्याने त्यांनी चौकशी केली असता सर्वच नागरिक त्रस्त असल्याचे समोर आले. यामुळे घोलप यांनी डायल ११२ वर तक्रार केली असता, काही वेळात त्याठिकाणी आलेल्या पोलिसांनीही संपूर्ण परिसरात ठसका येत असल्याचे त्यांना सांगितले.